तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

कोरोनाचा संसर्ग हा तामलवाडी ता तुळजापुर गावच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला असुन ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधक उपाय म्हणून  तामलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने १४वा वित्त आयोगाच्या निधीमधुन सॅनिटाइजर व मास्कचे वाटप करण्याची मागणी नागरीकांमधुन होताना दिसत आहे.

     कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असुन राज्यातील अनेक शहरामध्ये या संसर्गाने कहरच केला आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नाची पराकाष्ठा करतच आहे.या कोरोना विषाणूचा संसर्ग ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरताना दिसत आहे.तामलवाडी गावापासुन अवघ्या दहा की.मी.अंतरावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील उळे या गावामध्ये कोरोनाचा रूग्ण आढळला आणि तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी व परीसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.आतामात्र कोरोनाचा संसर्ग जवळ आल्याने  तामलवाडी गावामध्ये आतातरी नागरीकांची काळजी घेण्यासाठी  ग्रामपंचायतीच्या वतीने  १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधुन सॅनिटाइजर व मास्कचे वाटप करण्याची गरज आहे गावामध्ये  आजतागायत ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क व सॅनिटाइजरचे वाटप करण्यात आले नसल्याचे काही ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आहे.

जिल्हाबंदीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये आला असुन सिमेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे परंतु जिल्हाबंदीचे उल्लंघन करून काही महाशय छुप्या रस्त्याने दररोज सोलापूर येथे ये जा करत आहेत.पोलीस प्रशासनाला याची माहीती देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नेमणुक केलेले अधिकारी कोरोना कक्षाकडे फिरकलेच नाहीत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी येथे कोरोनो कक्षाची स्थापना करण्यात आली असुन त्यामध्ये डाॅ संगीता चव्हाण,शुभांगी जळकोटे सहकारी जामाबाई करंडे व आशा कार्यकर्त्या इ. महीला काम करत आहेत बाकी कोरोना कक्षासाठी नेमलेले संबधित अधिकारी कोरोना कक्षाकडे फिरकलेच नसल्याचे सांगण्यात आले आहे.

तामलवाडी येथे रूग्णवाहीकेची गरज

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुंबई,पुणे,सोलापूर व इतर ठिकाणाहुन गावामध्ये आलेल्या नागरीकांची आरोग्य उपकेंद्राकडुन विचारपुस केली जाते परंतु अशा व्यक्तीना उस्मानाबाद येथे तपासणीसाठी  जाण्याकरीता सांगितले असता ते स्वतःहुन वाहनाने जात नाहीत. याकरीता तामलवाडी आरोग्य उपकेंद्र येथे एका रूग्णवाहीकेची गरज असल्याचे ग्रामस्थ व डाॅ.संगीता चव्हाण यांच्यावतीने सांगण्यात येत आहे.
 
Top