![]() |
प्रा. महेश मोटे |
कोरोना महामारीचे घातक संकट दिवसेंदिवस हाहाकार माजवित आहे.आज जगातील बोटावर मोजण्याएवढे देश सोडले तर सध्या १८७ राष्ट्रामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे.संपूर्ण जगात लाखापेक्षा अधिक लोक कोरोनाचे बळी ठरलेले आहेत.लाखो लोकांना कोरोनाची बाधा तर हजारो लोक मृत्यु मुखी पडले आहेत.
महासत्ता असलेल्या अमेरिका व युरोपीय राष्ट्रात अर्थात फ्रान्स, जर्मनी,इटली,इंग्लंड,स्पेन आदी.कोरोना संसर्गाचे वाढते तांडव सुरू आहे.अमेरिका व युरोपातील प्रगत राष्ट्र कोरोना महामारीपुढे अक्षरशः हतबल झाले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर कोरोनाच्या प्रसाराला जबाबदार कोण ?असा एकच प्रश्न संपूर्ण जगासमोर पडलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारणाच्या स्वार्थापोटी आणि अभिलाषेपोटी जगात महासत्ता बनण्याच्या हेतूने चीनने नाहक मनुष्यहानीचा हा मार्ग स्वीकारा.साहजिकच या प्रश्नातून संशयाची सुई चीनकडे वळतांना दिसून येते.जगातील प्रमुख राष्ट्र कोरोनाच्या प्रसाराबाबत चीनला जबाबदार धरत आहेत.त्यामुळे कोरोना संकटाबाबत चीनचा पाय दिवसेंदिवस खोलात जातांना दिसत आहे. तसेच चीनवर जगातील प्रमुख राष्ट्रांकडून कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय दबावही वाढतच आहे.
चीनमधील वुहान शहरातून कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रारंभ झाला,त्या वुहान शहरात आशिया खंडातील सर्वात मोठी विषाणूंवर संशोधन करणारी प्रयोगशाळा आहे.या प्रयोगशाळेत १५०० पेक्षा अधिक घातक विषाणू असल्याचे बोलले जात आहे.खुद्द चीन या प्रयोगशाळेला आशियातील सर्वात मोठी 'व्हायरस बँक' असे संबोधतो.या प्रयोगशाळेत प्राण्यांमधील विषाणूंवर संशोधन केले जाते.संसर्गजन्य आजारांना कोणते विषाणू कारणीभूत ठरतात,याचेही संशोधन करून या प्रयोगशाळेत निष्कर्ष काढले जातात.
जगातील अनेक देश व त्या देशातील शास्त्रज्ञांच्या मते,या प्रयोगशाळेत एका प्राण्यावर प्रयोग करतांना कोरोनाचा विषाणू बाहेर पडला आणि यातूनच कोरोनाच्या संसर्गाला वुहानमधूनच प्रारंभ झाला.मात्र चीनने शास्त्रज्ञांचा हा दावा फेटाळून लावत कोरोनाचा संसर्ग चीनमधील व सी फूड मार्केटमधून झाल्याचा दावा चीन करीत असला तरी चीनच्या दाव्यावर जगातील देश व शास्त्रज्ञांचा विश्वास बसत नाही.फ्रान्समधील नोबेल विजेते शास्त्रज्ञ लूक मोंटेंगर यांनी केलेल्या दाव्यामुळे तर संपूर्ण जगात खळबळ निर्माण झालेली आहे.त्यांच्या मते, वुहानमधील विषाणूंवर संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेत एड्सवरील एच.आय.व्ही.वर संशोधन सुरू असतांना कोरोना विषाणूची निर्मिती झाली.यामुळेच कोरोना विषाणूच्या गुणधर्मांमध्ये एचआयव्ही,एड्स व मलेरियाच्या घटकांची शक्यता असल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
चीनने या शास्त्रज्ञांचा दावा फेटाळून लावलेला आहे.त्याचप्रमाणे वुहान प्रयोगशाळेच्या प्रमुखांनी देखील वुहान प्रयोगशाळेचा आणि कोरोनाच्या प्रसाराचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.वुहान ही विषाणूंवर संशोधन करणारी प्रयोगशाळा असल्यामुळे या प्रयोगशाळेतील सुरक्षाविषयक नियम अतिशय कठोर असल्यामुळे या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार होणे शक्य नसल्याचे मत वुहान प्रयोगशाळेच्या प्रमुखांनी व्यक्त केलेले आहे,मात्र यावर जगाचा विश्वास बसत नाही.याला कारण चीनचा आजवरच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिकेचा इतिहास आहे.अनेकवेळा चीनने महत्त्वाच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्टपणे जगासमोर मांडलेली नाही.वुहानच्या प्रयोगशाळेतील सुरक्षेवर चीन ठाम असला तरी खुद्द चीनमधील एका प्रसारमाध्यमाने वुहानमधील विषाणूच्या प्रयोगशाळेतील काही फोटो प्रसिद्ध केलेले आहेत.या फोटोवरून प्रयोगशाळेत वास्तवात किती खबरदारी घेतली जाते ? याबाबत शंका उपस्थित होते.या फोटोमध्ये ज्या उपकरणात वा फ्रीजमध्ये विविध विषाणू साठवून ठेवले जातात,ती साधनेच खराब झालेली आहेत वा अशा घातक विषाणूंना साठवण्यास पूर्णपणे सुरक्षित नाहीत,हेच दिसून येते. या चीनी प्रसारमाध्यमांनुसार वुहानच्या विषाणूंवर संशोधन केल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेत सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार झालेला आहे काय ? अशी शंका घेण्यास जागा आहे.
आज कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग विस्कळीत झाले असून जगातील व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत.मात्र ज्या देशातून कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली.त्या चीनमधील सर्व व्यवहार मात्र सुरळीत सुरू आहेत.कोरोना संसर्गाचा जन्मदाता चीन आज जगात कोरोनाबाधित राष्ट्रांच्या यादीत पहिल्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचलेला आहे,मात्र चीनमधून कोरोनाचा संसर्ग झालेले अमेरिका,फ्रान्स,इटली,स्पेन,जपान आदी देश आज कोरोना बाधितांच्या संख्येनुसार कोरोनाबाधित राष्ट्रांच्या यादीत चीनपेक्षा वरच्या स्थानावर पोहोचलेले आहेत.या सर्व राष्ट्रांत चीनपेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत.तसेच चीनमध्ये वुहान शहराच्या बाहेर कोरोनाचा प्रसार झालेला नाही,मात्र जगातील हजारो किलोमीटर इतर राष्ट्रात कोरोनाचा प्रसार झालाच कसा ? हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आणि यातूनच शंकेची पाल चुकचुकते.जगातील सर्व प्रमुख शहरे बंद असताना चीनमधील शांघाय व बीजिंग ही व्यापारी शहरे सुरू कशी ? चीन कोरोना प्रसाराबाबत आपली भूमिका स्पष्टपणे का मांडत नाही ? चीनवर अनेक राष्ट्र टीका करीत असतांना चीन कोरोनाबाबत स्पष्टपणे का बोलत नाही ? असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.तसेच यावरून चीनची भूमिका शंकास्पद असल्याची शक्यता अधिकच बळावते.चीनच्या या भूमिकेमुळे चीनवर दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चाललेला आहे.कोरोनाच्या प्रसारावरून सुरुवातीपासूनच अमेरिका व चीनमध्ये शाबदीक युद्ध चांगलेच रंगलेले आहे.कोरोनावरून दोन्ही देशांमध्ये शीतयुद्धाची तयारी सुरू झाल्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक, विश्लेषक व जाणकार सांगत आहेत.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये तसेच [WHO]आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेमध्येदेखील अमेरिका व चीनच्या प्रतिनिधींनी परस्परांवर कोरोनाच्या प्रसारावरून वाद-प्रतिवाद केलेले आहेत.कोरोनाच्या प्रसारावरून अमेरिकेने सुरूवातीपासूनच चीनला धारेवर धरून चीनवर जोरदारपणे टीका करून थेटपणे आरोप करीत आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना प्रसारास चीन जबाबदार असल्याचे स्पष्ट करून चीनवर आगपाखड केलेली आहे.चीनच्या विरोधात प्रारंभी फक्त अमेरिकेनेच आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका केल्याचे संपूर्ण जगाने बघितले,म्हणजे प्रारंभी कोरोना प्रसारावरून केवळ अमेरिकेने चीनवर दबाव टाकलेला आहे,मात्र आता चीन विरोधात अनेक राष्ट्र एकत्र आलेली आहेत.म्हणजेच आठवडाभरापूर्वी चीन विरोधात केवळ अमेरिकाच बोलत होती,मात्र आता चीन विरोधात बोलणाऱ्या राष्ट्रांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढतांना स्पष्टपणे दिसून येत आहे.
चीनविरोधातील अमेरिकेच्या भूमिकेचे जपान,ऑस्ट्रेलिया,जर्मनी,ब्रिटन,फ्रान्स आणि भारत या राष्ट्रांनी जोरदारपणे समर्थन केलेले आहे.या राष्ट्रांनी अमेरिकेच्या भूमिकेचे केवळ समर्थनच केलेले नाही,तर चीनविरोधी भूमिका घेऊन चीनवर बंधने टाकावयास सुरुवातही केलेली आहे.याचा दुरगामी परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होणार.यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे दिसून येत आहे.कोरोना प्रसाराबाबत चीनला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे द्यावी लागणार आहेत,अशा शब्दात ब्रिटनने चीनला ठणकावले आहे.त्याप्रमाणे चीनच्या कोरोना विषाणूजन्य रोगाचा प्रसाराबाबतीमधील अपारदर्शक भूमिकेवर बोट ठेवून ऑस्ट्रेलियाने चीनच्या याबाबतीच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.तसेच चीनमधील अनेक जपानी कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेत चीनला कायमचा रामराम ठोकलेला आहे.जपानची ही भूमिका म्हणजे चीनला जोरदार धक्का आहे.फ्रान्सनेदेखील कोरोना प्रसाराबाबत चीनने घेतलेल्या चुकीच्या भूमिकेवर शंका उपस्थित करून याबाबत चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.त्याचप्रमाणे जर्मनीने त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या झालेल्या नुकसानीला चीनला जबाबदार धरलेले आहे.जर्मन प्रसारमाध्यमांनीदेखील जर्मन अर्थव्यवस्था मोडकळीस आणल्याचा आरोप चीनवर केलेला आहे.भारतानेदेखील चीनविरोधी भूमिका घेत चीनी कंपन्यांना परवानगीशिवाय भारतात उत्पादन करता येणार नाही,अशी अट घातलेली आहे.भारताकडून चीनी कंपन्यांची अर्थातच चीनची चौफेर आर्थिक नाकाबंदी केली जात आहे.भारताच्या या निर्णयामुळे चीनचा तिळपापड झालेला आहे.थोडक्यात कोरोना प्रसारामुळे प्रारंभी अमेरिकेनेच चीनला आरोपीच्या पिंज-यात उभे केले होते,मात्र आता जगातील प्रमुख राष्ट्र अमेरिकेसोबत येऊन अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्यामुळे चीनवर दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चाललेला आहे. यातून चीन हे राष्ट्र जगातील प्रमुख राष्ट्रांच्या रडारवर सध्या तरी आलेले आहे,हे मात्र नक्कीच.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना प्रसाराबाबत चीनला सातत्याने जबाबदार धरून प्रत्येक दिवशी चीनवर आरोप- प्रत्यारोप करीत आहेत.यामुळे चीन आता जगाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे.अमेरिकेने चीनला इशारा देऊन कोरोनाबाबत आपली भूमिका जगासमोर जाहीर करण्याचे आवाहन केलेले आहे.चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार कसा झाला,याची शहानिशा करून खातरजमा करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन शास्त्रज्ञांची एक टिम चीनला पाठवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.अशा तणावपूर्ण आंतरराष्ट्रीय परिस्थितीत चीन कोरोना प्रसाराबाबत काहीही बोलण्यास तयार नाही.अमेरिका व इतर राष्ट्रांनी चीन विरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सध्यातरी चीनचे धाबे दणाणले आहेत,यात तिळमात्र शंका नाही.कारण जगातील प्रमुख देश अमेरिकेच्या भूमिकेचे जोरदारपणे समर्थन करीत आहेत.कोरोना प्रसारावरून चीन विरोधात दिवसेंदिवस संताप वाढून जागतिक असंतोषात वाढ होत आहे,जे चीनसाठी भविष्यात अत्यंत भयानक ठरू शकते.कोरोना प्रसाराची शहानिशा करण्यासाठी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांची टीम चीनमध्ये जाणार काय ? चीनमधून झालेल्या कोरोना प्रसाराचे सत्य चीनवरील आंतरराष्ट्रीय दबावामुळे बाहेर येणार का ? चीन आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमेल काय ? चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याच्या प्रयत्नात अमेरिका यशस्वी होईल काय ? चीनच्या वुहान प्रयोगशाळेत कोरोना प्रसाराबाबत नेमकं काय घडलं ? चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू संपूर्ण जगभर पसरेल याची पुरेपूर व्यवस्था केली होती काय ? कोरोना विषाणू चीनने वुहान प्रयोगशाळेत जाणीवपूर्वक उत्क्रांत केलेला आहे काय ?चीनची राक्षसीवॄती कोरोना प्रसारास जबाबदार आहे काय ? चीन जगातील बड्या राष्ट्रांच्या चक्रव्युहामध्ये अडकलाय काय ? कोरोना प्रसाराबाबत चीनचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे काय ? राक्षसीप्रवॄतीच्या चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्याचा विचार कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने करण्याची गरज आहे काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. या प्रश्नांची उत्तरे नजीकच्या भविष्यात मिळतीलच,मात्र कोरोनाच्या प्रसाराला चीनला जबाबदार धरून चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढतच आहे आणि त्यामुळे चीनचे धाबे सध्यातरी दणाणले आहे,एवढं मात्र नक्कीच.आता बाप दाखवं नाही तर सराधं कर या म्हणी प्रमाणे चीनची अवस्था झाली आहे.हे जैविकच युद्ध असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
- प्रा.डॉ.महेश मोटे
सहयोगी प्राध्यापक
राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभाग
श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम, ता.उमरगा.जि.उस्मानाबाद.