काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मागील तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु असून त्यात वाढलेल्या प्रचंड उकाड्यात लॉकडाऊनमुळे घरी बसलेले नागरिक प्रचंड वैतागले आहेत. या काळात तरी महावितरणने अखंडित वीजपुरवठा सुरु ठेवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

काटी येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. लोक घराबाहेर पडत नाहीत, त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवणे आवश्यक आहे. परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित का होतो ? याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात चौकशी केली असता वरूनच वीज खंडित झाली तेथील काम झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होईल असे उत्तर मिळते.वास्तविक पाहता उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे सर्व नागरिक आपापल्या घरांमध्ये बंद आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर व घरातील सर्व सदस्य एकत्र घरात असल्यानंतर उष्णतेचे प्रमाण अधिकच वाढते. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार वीजपुरवठा खंडित का होतो? याबाबत चौकशी करून नागरिकांना जास्तीत जास्त वेळ वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
 
Top