तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
कोवीड - १९ चा वाढता संसर्ग लक्षात घेता तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतीने १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधुन दोन थर्मल तपासणी यंत्र खरेदी केले असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व नागरीकांची थर्मल तपासणी करण्यात येणार असल्याचे सरपंच दत्तात्रय वडणे यानी सांगितले. दि.१४ रोजी गावातील आशा कार्यकर्त्या यांच्याकडे या मशीन ग्रामसेवक व सरपंच यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आल्या आहेत.
कोविड- १९ या विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे.राज्यातील अनेक शहरामध्ये या संसर्गाने थैमान घातले असुन सोलापूर शहरातही कोरोना रूग्णांची संख्या ही तीनशेच्या वर गेली.तामलवाडी गावापासुन अवघ्या दहा की.मी.अंतरावरील उळे या गावामध्ये कोरोनाचा रूग्ण आढळल्याने तसेच तामलवाडी येथील सोलापुर जिल्ह्याच्या सिमेवरही कोरोनाचे रूग्ण सापडल्याने तामलवाडी हे गाव बफर झोनमध्ये आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर गावामध्ये नागरीकांची थर्मल मशीनच्या माध्यमातून तपासणी व्हावी व गाव कोरोनामुक्त रहावा यासाठी तामलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधुन दोन थर्मल मशीन खरेदी केल्या आहेत.या दोन थर्मल मशीन दि.१४ रोजी आशा कार्यकर्त्या यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. या दोन थर्मल मशीनच्या मदतीने गावातील आशा कार्यकर्त्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वच नागरीकांची थर्मल तपासणी करणार असल्याचे सरपंच दत्तात्रय वडणे व ग्रामसेवक पी.एन लाटकर यानी सांगितले.
याप्रसंगी ग्रामसेवक पी.एन लाटकर,सरपंच दत्तात्रय वडणे,आरोग्य उपकेंद्राच्या डाॅ.संगीता चव्हाण,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सर्जेराव गायकवाड,माजी उपसरपंच हमीद पठाण,शशिकांत गायकवाड,शिवाजी माळी,दस्तगीर पटेल, सविता रणसुरे,अनिता लोखंडे,चंद्रकला रणसुरे,सपना शिंदे,जामाबाई करंडे,शिला गंगावणे,रेखा बोबडे आदी उपस्थित होते.
मास्क व सॅनिटाइजरचीही मागणी
ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या थर्मल मशीन ताब्यात घेतल्यानंतर आशा कार्यकर्त्या यानी ग्रामपंचायतीकडे मास्क व सॅनिटाइजरचीही मागणी केली.प्रत्येक नागरीकांची थर्मल तपासणी केल्यानंतर लगेच मास्क व सॅनिटाइजर देण्यास मदत होईल.यावेळी लवकरच मास्क व सॅनिटाइजरही उपलब्ध करून देऊ असे सरपंच व ग्रामसेवक यांच्या वतीने सांगण्यात आले असल्याचे आशा सुनिता लोखंडे यानी सांगितले.
