मुरुम, दि. ३१ :
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील शिंदे गल्लीतील मुळचे पण सध्या हिमाचल प्रदेशामध्ये अभियंता पदावर कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे व रुपाली शिंदे यांचा रविवारी(ता.३१) रोजी लग्नाचा २५ वा वाढदिवस आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंतीचे औचित्य साधून व सध्या निर्माण झालेल्या कोरोना संकटामध्ये आपणही मदत केली पाहिजे. सध्याचे हे संकट खुप मोठे होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशावर मोठे आर्थिक संकट असताना आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्चाला फाटा देवून तो खर्च आम्ही दोघांनी ठरवले की, गरजूंच्या मदतीसाठी कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच हजार रुपयाची रक्कम ऑनलाईनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करू आणि समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय साहित्याकरिता प्रत्येकी पाचशे रुपये असे ३० विद्यार्थ्यांना मिळून पंधरा हजार रुपये त्यांच्या घरोघरी जावून वाटप करण्याचे ठरविले. आज तो संकल्प पूर्ण केला.
यावेळी वीरशैव कैककय्या महाराज संघटनेचे अध्यक्ष वसंत शिंदे, उपाध्यक्ष धनराज शिंदे, शिवाजी शिंदे, गिरजाप्पा कवाळे, तात्याराव शिंदे, राजू कटके, सचिन शिंदे, श्रावण कटके, रेवण कटके आदींनी शिंदे गल्लीतील राजेंद्र कटके, सुलभा कटके, राजेंद्र शिंदे, हनुमंत शिंदे, अंबादास शिंदे तर नेहरू नगर मधील श्रावण कटके, ईश्वर नारायणकर, लक्ष्मण शिंदे, पांडू खरटमल, रूक्मीणी चौघुले आदी पालकांच्या घरी जावून पाचशे रुपयाचे पॉकेट सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून देण्यात आले. शिंदे परिवारांचे सामाजिक बांधिलकीचे भान व समाजाप्रती असणारी कृतज्ञता भाव आज दुर्मिळ होत चाललेला असताना या पती-पत्नीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. समाज बांधवांनीही त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
