तुळजापूर, दि. ०३ :

सध्या कोरोनाच्या अडचणी काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याने तात्काळ दूध संघावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे  कृषी व दुग्धविकास शॅडो कॅबीनेट मंत्री तथा माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज लाखो लिटर दुधाचे संकलन केले जात असते. कोरोनामुळे जागतिक पातळीवरील आपत्ती देशावर आली आहे.सध्या देशाच्या सर्व भागांमध्ये लोकडाऊन असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. देश अनंत अडचणी मध्ये सापडलेला आहे. केंद्र आणि सर्व राज्य शासन या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना तसेच दानशूर व्यक्ती मदतीचा हात देऊन गोरगरीब लोकांना मदत करीत आहेत. शासनाने देखील शेती आणि शेतकरी यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेले आहेत.असे असताना मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील दूध संघाकडून शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. शासनाने निर्धारित केलेल्या पंचवीस रुपये दर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जात नाही. प्रत्येक लिटर मागे दहा रुपयेंची लुबाडणूक खुलेआमपणे केली जात आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यात शासन आदेशाची पायमल्ली केली जात आहे.

अडचणीच्या काळात शेतकरी आपला दूध व्यवसाय करण्यासाठी मोठ्या अडचणी सहन करून दूध संघा पर्यंत आपले दुध पोहचवत आहे. अशा परिस्थितीमध्ये दूध संघाने केलेली लूबाडणूकीची कृती अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे सर्व दूध संघावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे ही जिल्हा मनसेची भूमिका असून यासंदर्भात आपण उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ यांच्याशी चर्चा करून तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे आदेश द्यावेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दूध व्यवसाय याशिवाय कोणताही दुसरा आधार सध्या नाही, स्वतःच्या अडचणीत स्वतःहून शेतकरी दूध व्यवसाय करीत आहे त्यांना दूध संघाकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही उलट त्यांची लुबाडणूक करण्याचा प्रकार या आपत्तीच्या काळात चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या अन्यायाच्या विरोधात गप्प बसणार नाही, लवकरच योग्य ती कार्यवाही शासनाकडून नाही झाली तर शेतकरी हितासाठी या संदर्भात जिल्हा दूध संघाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

       
 
Top