ताज्या घडामोडी


तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

कोवीड - १९ या विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे गावच्या सुरक्षेसाठी तामलवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत गावामध्ये ग्रामसुरक्षा दलाची नेमणुक करण्यात आली असुन ते सध्या  कार्यरत झाले असल्याचेही सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मीरकर यानी बोलताना सांगितले आहे.

       कोवीड - १९ च्या वाढत्या संसर्गाने देशासह राज्यातील जनतेला सळो की पळो करून सोडले आहे.या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या जिवघेण्या विषाणुपासुन जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता पोलिस प्रशासन,डाॅक्टर,नर्स असे योद्धे रात्रंदिवस काम करताना दिसत आहेत.उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी शेजारील सोलापुर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. हा वाढता धोका लक्षात घेता व तामलवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत जास्त गावे व अपुरे पोलिस संख्याबळ यामुळे  पोलीसावर मोठा ताण पडत असल्याने वरीष्ठांच्या आदेशाने येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मीरकर यानी गावातील तरूणांना या कोवीड - १९ या विषाणुचा सामना करण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची नेमणुक करून आपल्यासोबत घेतले आहे .या तरूणांना पोलिस स्टेशनच्या वतीने ओळखपत्र देण्यात आली असुन ते सध्या कार्यरत झाले असल्याचेही सपोनि नितीन मिरकर यानी बोलताना सांगितले आहे.गावामध्ये विनामास्क फिरणे,सामाजिक अंतर न ठेवता एकत्र घोळका करून बसणे तसेच मुंबई,पुणे,सोलापूर तसेच इतर रेड झोनमधुन गावामध्ये आलेल्या व्यक्तींची नावे टिपणे,छुप्या रस्त्याने ये - जा करणे अशा व्यक्तींवर ते आपल्या मोबाइलच्या सहाय्याने नजर ठेवतील व त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणार्या अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल तसेच या ओळखपत्राचा दुरूपयोग झाल्यास संबधित तरूणाकडुन ते ओळखपत्र परत घेतले जाईल व त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल.या कोवीड- १९ वर मात करण्यासाठी प्रत्येकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व आपला गाव,तालुका, जिल्हा कोरोनोमुक्तच रहावा यासाठी प्रयत्न करावे असेही सपोनि   नितीन मीरकर यानी सांगितले आहे.
 
Top