तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

कोरोनो विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी ते  होनसळ हा सोलापूर जिल्ह्यास जोडणारा अंतररस्ता तामलवाडी ग्रामस्थांनी खबरदारीचा उपाय म्हणून जेसीबीच्या सहाय्याने खोदुन बंद करण्यात आला आहे.

      कोरोना या संसर्गाने सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या शंभरीपार गेली असुन या संसर्गाने  सहाजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सोलापूर ही मोठी बाजारपेठ असल्याने तामलवाडी व परीसरातील नागरीकांचा सोलापूर शहराशी जवळचा संबंध आहे.परंतु या कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या असुन सिमेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सिमेवर कडक बंदोबस्त असतानाही सोलापूर जिल्ह्यातील तामलवाडी शेजारील गावातील काही नागरीक हे छुप्या मार्गाने उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी गावात दररोज प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले  तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातीलही काही नागरीक पोलीसांच्या नजरा चुकवुन छुप्या मार्गाने सोलापूर शहर जिल्ह्यात जात असल्याने तामलवाडीसह परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले होते.कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील देवकुरूळी,वडगाव काटी,काटी,सावरगाव गंजेवाडी,पिंपळा बु.अशा अनेक गावातील नागरीकांनी आपापल्या गावच्या सिमा बंद केल्या असुन बाहेरगावाहुन येणार्या नागरीकांना तिथे चौकशी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.परंतु तामलवाडी हे राष्ट्रीय महामार्गावरील मोठे गाव असल्याने परजिल्ह्यातील शेजारील गावामधुन अनेक लोक विनापरवाना खते,बियाणे,शेतीविषयक वस्तु  घेण्यासाठी तसेच भाजीपाला,फळे विक्रीसाठी तसेच काही इतर कामानिमित्त  तामलवाडी व परीसरातील गावामध्ये छुप्या मार्गाने येत होते. जिल्हाबंदी असतानाही परजिल्ह्यातील अशा व्यक्ती तामलवाडी व परीसरात येत आहेत व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही व्यक्ती छुप्या मार्गाने सोलापूर जिल्ह्यात जात असल्याने तामलवाडी ग्रामस्थांनी हा छुपा मार्ग जेसीबीच्या सहाय्याने खोदुन बंद केला आहे.जिल्हाबंदीचे आदेश असतानाही अशा व्यक्ती तामलवाडी व परीसरात आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सपोनि नितीन मिरकर यानी बोलताना सांगितले.

कटारे मिलच्या पाठीमागुन होतेय ये-जा

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्याच्या सिमेवर कडक पोलिस बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या नजरा चुकवुन काही महाशय हे कोरोनाला गांभीर्याने न घेता तामलवाडी गावामधुन कटारे स्पिनींग मिलच्या पाठीमागुन छुप्या रस्त्याने सोलापूर शहर व सोलापूर जिल्ह्यातील इतर गावात  ये-जा करून जिल्हाबंदीचे उल्लंघन करत आहेत.खबरदारी म्हणुन हा छुपा रस्ताही बंद करावा अशी मागणी होत आहे.
 
Top