तुळजापूर : कुमार नाईकवाडी
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानातील सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचा-यांचे मार्च व एप्रिल महिन्यांचा संपूर्ण पगार कुठलीही कपात न करता त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्यावतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी यांना देण्यात येत असलेल्या पगार हा मूळातच किमान वेतनाचा वेतन कायदान्वये देय असलेल्या पगारापेक्षा खूपच कमी आहे. अशा तोटक्या पगारावर हे कर्मचारी त्यांचा संसार मोठया मुश्कीलीने ओढतात. अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच मार्च आणि एप्रिल या महिन्यात कर्मचा-यांच्या पगारात मोठी कपात करण्यात आल. त्यामुळे या कर्मचा-यांचा मूळ अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेने आधीपासूनच प्रलंबित रिट याचिका क्रमांक 4013/2020 मध्ये लॉकडाऊन काळातील पगारात बद्दल सुध्दा दाद मागणे क्रमप्राप्त झाली. प्रकरणाचे गांभीर्य व तातडीची गरज लक्षात घेता मा. उच्च न्यायालयाने या प्रकरणी दि. 8 मे व दि. 12 मे 2020 रोजी सुनावणी घेतली. या सुनावणीअंती दि. 12 मे रोजी च्या आदेशान्वये उच्च न्यायालयाने या कर्मचा-यांचा मार्च व एप्रिल या महिन्याचा संपूर्ण पगार कुठलीही कपात न करता त्यांच्या पदरात पडेल ही जबाबदारी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष यांच्यावर ठेवलेली आहे व त्याप्रमाणे व्यवस्था करण्याचे आदेश दिलेले आहे. तसेच “काम नाही तर पगार नाही” हे तत्व उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईलपर्यंत कर्मचा-यांना लागू करता करता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशित केले आहे.
त्यामुळे मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मंदीर संस्थानातील सर्व कर्मचा-यांचे मार्च व एप्रिल महिन्यांचा उर्वरित पगार हा कुठला ही विलंब न करता त्यांच्या खात्यावर जमा करावा, तसेच मे महिन्यांचा संपूर्ण पगार सुध्दा वेळेवर दया व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी विनंती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आाहे. या निवेदनाची एक प्रत माहितीस्तव तुळजापूर तहसिलदार यांना देण्यात आली आहे.