तुळजापूर, दि. 19 : तुळजापूर शहरातील काही खताच्या दुकानांमध्ये खते व बियाणे जादा दराने विक्री होत असून शेतक-यांची लुटमार करणा-या दुकानाचे परवाने रद्द करुन दुकानदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्यावतीने तुळजापूर तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहरातील काही खत व बीबी यांच्या दुकानांमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची आर्थिक लुटमार होत असून कोरोनाच्या अशा महामारी काळात सर्वांची आर्थिक स्थिती कोलमडली असताना 20.20.00.13 खत 1000 रुपयाचे असून ते खत 1060 रुपयाचे विक्री होत आहे. शहरात खत व बियाण्यात जादा पैसे घेऊन शेतकऱ्यांची लुबाडणूक चालू असून अगोदरच कोरोना महामारीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यात या तुळजापूर तालुक्यातील कृषी दुकानदारांची भर पडली आहे. या लूटमार करणाऱ्या सर्वच दुकानदारांवर तात्काळ कारवाई करून सर्व दुकानदांराचे परवाने तात्काळ रद्द करण्यात मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर भ्रष्टाचार निर्मुलनचे समितीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष विजय भोसले, तालुका उपाध्यक्ष दिनेश पलंगे, संपर्कप्रमुख मदन रांजणकर, संघटक प्रमुख रोहित दाभाडे, शहराध्यक्ष शुभम भिसे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

