काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी  येथे कोरोना संशयित रुग्ण आढळुन आला होता. त्यामुळे काटी येथील नागरिक भयभीत झाले होते.परंतु गुरुवारी आलेल्या रिपोर्ट मध्ये त्या संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. परंतु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काटी ग्रामपंचायतीच्या वतीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काटी गावात भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या संदर्भात घेतलेल्या कामाचा व त्यावरील उपाय योजना संदर्भात आढावा घेण्यात आला.

 त्याचबरोबर त्यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधून  नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना विषाणू संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. यावेळी काटी ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, कोरोना कक्ष अधिकारी तलाठी प्रशांत गुळवे यांनी मागील तीन महिन्यांपासून केलेल्या कामाची माहिती देऊन संशयित रुग्णाचा परिसरात दोन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचे सांगितले.

गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्याच्या सुचना दिल्या. तसेच पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क राहावे. तसेच ग्रामस्थांनी प्रशासन मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे  आवाहन केले. 

       यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी निधीची मागणी केली. यावर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी अंतर्गत रस्त्यांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.

    यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, एस.डी.ओ.रोडगे,आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मिरकर, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, सयाजीराव देशमुख, मकरंद देशमुख, तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, बाळासाहेब भाले, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top