तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभारा विरोधात अन्न पुरवठा मंत्री,जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी,तहसीलदार यांच्याकडे भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत व पिंपळा खुर्द ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली होती त्याची प्रशासनाने दखल घेत येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करून संबधित रास्तभाव दुकानाचे अभिलेखे जप्त करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी डाॅ चारूशीला देशमुख यानी तहसीलदार तुळजापुर याना पत्राद्वारे दिले आहेत.

       पिंपळा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकान हे श्रीमती एस.आर.मस्के यांच्या नावे होते परंतु सदरील दुकान हे त्यांचा नातु अनुपकुमार कांबळे हा चालवीत होता.त्याच्यावर गावातील जनतेला शिधापत्रिकेनुसार धान्य न देणे,नविन शिधापत्रिका देतो म्हणून पैसे उकळणे,अनेकांच्या शिधापत्रिकाच गायब होणे,शिधापत्रिकेवरून सदस्यांची नावे गायब होणे,गरीबांना धान्य न देणे,धान्य घेतल्यानंतर पावती न देणे, ग्राहकाला मारहाण करणे असे आरोप करीत येथील स्वस्त धान्य दुकानदार विरोधात ग्रामस्थ व भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ,पालकमंत्री, जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी, यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने चौकशी करण्यात आली व तहसीलदार तुळजापुर यानी निरीक्षण अधिकारी तुळजापुर यांचेमार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी याना अहवाल सादर केला.या अहवालानुसार संबधित दुकानामधुन स्वस्त धान्य जास्त दराने वाटप केले  जाते,कार्डधारकाना युनिट प्रमाणे धान्य वाटप न करता ई पाॅस मशीनवर जास्त धान्याची पावती काढुन प्रत्यक्षात कमी धान्य दिले जाते तसेच घेतलेल्या धान्याची पावती दिली जात नाही अशा चुका आढळल्या.याबाबत दुकानदार श्रीमती मस्के याना खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले. श्रीमती मस्के यानी लेखी खुलासा सादरही केला परंतु तो खुलासा असमाधानकारक असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी डाॅ.चारूशीला देशमुख यानी संबंधित रास्त भाव दुकानाचा परवाना निलंबित करून रास्तभाव दुकानाचे अभिलेखे जप्त करुन ताब्यात घ्यावेत तसेच गावातील जनतेचे गैरसोय होऊ नये याकरिता जवळच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे व्यवस्था करावी असे आदेश तहसीलदार तुळजापुर याना देण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे.तसेच उप आयुक्त पुरवठा औरंगाबाद यांचे पत्र क्रं ९८/ एसबी /अपिल/ ७.२.१९९८ व शासन निर्णय १२ नोव्हेंबर १९९१ मधील तरतुदीनुसार या प्रकरणात तहसीलदार तुळजापुर यांचा चौकशी अहवाल प्राप्त होताच अंतिम निर्णयाकरीता पुढील तारीख देण्यात येणार असल्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
 
Top