मुरूम : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवस शुक्रवार ( ता.१९ ) रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्षांशी संवाद साधून चर्चा केली.

 यावेळी बसवराज पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सुचना  दिल्या. त्या-त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात अन्नदानाचे पॉकेट, मास्क, सॅनिटायझरचे वाटप, रक्तदान शिबिरे व कोरोना योध्दांचा गौरव व कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करावे. कोरोनाच्या संकटात हातावर पोट असणाऱ्या गरजूंना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी बसवराज पाटील साहेब यांच्या वतीने लातूर जिल्हयातील औसा व निलंगा तालुका तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, उमरगा व लोहारा या तालुक्यात १२ हजार अन्नाच्या पॉकेटचे वाटप करण्यात येणार आहे. या पॉकेटचे वाटप फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून नियोजन करावे. कोरोना या महामारीच्या संकटात नि:स्वार्थपणे जीवाची बाजी लावून लढा देणाऱ्या डॉक्टरर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलीस यंत्रणा व इतर क्षेत्रातही काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा यथोचित सन्मानही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Top