तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच पावसाळ्यामध्ये अस्वच्छ पाण्यामुळे इतर आजार बळावु नये यासाठी खबरदारी म्हणुन तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळ्यापुर्वी गावातील पाण्याच्या टाक्या जंतुनाशक पावडर टाकुन धुतल्या असुन जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.
एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे तर दुसरीकडे काही दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने कोरोना बरोबर पावसाळ्यामध्ये होणारे सर्दी,खोकला यासारख्या आजारांचाही जनतेला सामना करावा लागणार आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग वाढु नये यासाठी सामाजिक अंतर राखणे,स्वच्छता राखणे,मास्क वापरणे आवश्यक झाले आहे त्याचप्रमाणे पावसाळा सुरू झाला की घाणीमुळे,गढूळ पाण्यामुळे आजाराला आमंत्रण दिले जाते. कोरोना तसेच इतर आजार बळावु नये यासाठी पावसाळा सुरू होण्यापुर्वी गावातील नाली, गटारीची स्वच्छता,पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी काही दिवसापूर्वी राज्यातील सर्व नगर परिषद, ग्रामपंचायतीना केले होते. गावामधील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे व पाण्यामुळे आजार उद्भवु नये तसेच गावातील नागरीकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व लहान मोठ्या पाण्याच्या टाक्यांची जंतुनाशक पावडर टाकुन टाक्या धुवून घेऊन स्वच्छता करण्यात आली असुन पाण्यामध्येही जंतुनाशक पावडर टाकली असल्याचे ग्रामसेवक पी.एन.लाटकर यानी सांगितले आहे. पाऊसाळा सुरू होण्यापुर्वी पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली असुन एक दोन दिवसात गावातील गटारीचीही स्वच्छता करण्यात येणार आहे तसेच त्यावरही जंतुनाशक पावडर टाकण्यात येणार असल्याचेही ग्रामसेवक लाटकर यानी धनराज न्युजशी बोलताना सांगितले आहे.
टाक्यांची स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कामगार दस्तगीर पटेल,शिवाजी माळी,भारत रणसुरे यानी परीश्रम घेतले.
