नळदुर्ग, दि. 19 : सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे अशातच शेजारी देश चीन आपल्या देशाबरोबर कुरापती काढत आहे, परवाच गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात संघर्ष झाला. यात 20 भारतीय सैनिक शहीद झाले तर चीन ला जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी चीनच्या 40 पेक्षा जास्त चिनी सैनिकांना मारले. लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा नारा दिला होता. आज परत चीनच्या कृत्यामुळे आपल्याला चीनच्या कोणत्याही वस्तू खरेदी न करता स्वदेशी वस्तूंचा वापर करणे आवश्यक आहे. त्यांच्या आंदोलनाला साक्षी ठेऊन चीनच्या या कुरापती चा निषेध नोंदविण्यासाठी नळदुर्ग येथे लोकमान्य वाचनालय समोर शी जिनपिंग व चीनच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच चिनी मालाची होळी करून चीनच्या कुरापती चा निषेध व्यक्त करण्यात आला तत्पूर्वी शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना नळदुर्ग शहरवासीयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
चीनने केलेल्या कुरापतीला उत्तर देण्यासाठी सीमेवरील भारतीय जवान सज्ज आहेतच पण चीनसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे आपण एवढ्यावरच न थांबता चीनला आर्थिक दृष्ट्या नुकसान पोहचविण्यासाठी आणि चीनला वठणीवर आणण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी चीन बनावटीच्या वस्तुंवर बहिष्कार टाकावे हीच भारतीय जवानांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. तसेच आज नळदुर्ग शहरवासीयांच्या वतीने स्वदेशी वस्तुंचा वापर करत चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकावे असे आवाहन करणारे व चीन वस्तुंना पर्यायी उपलब्ध स्वदेशी वस्तू याबाबतचे पत्रक वाटण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार विलास येडगे, माजी नगरसेवक संजय बताले, भाजप शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले, युवासेनेचे ज्ञानेश्वर घोडके, युवामोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, कल्पना गायकवाड, संजय जाधव, पत्रकार शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, आरंभ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, भाजप सरचिटणीस विशाल डुकरे, शाम कणकधर, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, सागर हजारे, सुनील गव्हाणे, मयूर महाबोले, नेताजी महाबोले, राष्ट्रप्रेमी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
