तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने एक हजार कोटीचे आर्थिक अनुदान द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रा.प. महामंडळास कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुत करण्याच्या हेतुने १००० कोटी रुपये अनुदान देण्यात यावे, मे व जुन या महिन्याचा उर्वरीत ५० टक्के वेतन तात्काळ देण्यात यावे, माहे जुन देय जुलै या महिन्याचे वेतन देय असलेल्या तारखेस देण्यात यावे, एस.टी. कर्मचा-यांना शासकिय कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन देण्यात यावे, देशातील इतर राज्याप्रमाणे प्रवाशी कर १७.५ टक्के ऐवजी ७ टक्के आकारण्यात यावा, खाजगी कंत्राटे रद्द करावीत, मागील चार वर्षातील झालेल्या कामाच्या खर्चाची श्वेत पत्रिका काढावी, कंत्राटी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करुन त्यांनी घेतलेल्या निर्णयाची उच्चस्तरीय चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, राज्य शासनाने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था मजबूत करण्याच्या हेतुने तसेच राज्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, विविध सवलतीधारक, सर्वसामान्य जनतेला किफायतशीर दरात दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने मागण्यांची पूर्तता करून एस.टी. महामंडळास आर्थिक सहाय्य करून सक्षम करावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे तुळजापुर आगार अध्यक्ष श्री.बाळासाहेब पाटील, सचिव श्री.नागनाथ मसुते, अमित जाधव, कृष्णा राऊत, संतोष डावखरे, जावेद फुटाणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.