नळदुर्ग, दि. 23 : येथील अवैध धंदे बंद करावेत, त्याचबरोबर सक्तीने कर्ज वसूली करीत असलेल्या संबधित फायनांस कंपनी विरोधात कर्जदाराने तक्रार दिल्यास तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात सुरु असलेला मटका व अनेक प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे, त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आरबीआयने सर्व बँका व वित्तीय संस्थाना कर्ज वसूलीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली आहे. तरीही काही फायनांस कंपनी कर्ज़ादारांची वसूली करत असल्याचे सांगून अशा वेळेस जर कर्जदाराने संबधित फायनांस कंपनी अथवा कर्मचा-याच्या विरोधात तक्रार दिल्यास तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के आदींच्या स्वाक्ष-या आहेत.