मुरूम, दि. ११ : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरातील यशवंत नगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी (दि. ११) रोजी सकाळी प्राप्त झाला. नऊ तारखेला पाठवण्यात आलेल्या स्वॅब तपासणीतील प्रलंबित असलेला १ स्वॅब अहवाल पाठविण्यात आला होता. उमरगा तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या ५२ वर पोहचली असल्याने शहरात आजवर एकही रुग्ण नव्हता अचानकपणे हा रुग्ण आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित रुग्ण हा हॉटेल व्यावसायिक असल्याने अनेक लोकांच्या संपर्कात आले असल्याचे समजते. संबंधित लोकांनी ज्यांचा या रुग्णांची संबंध आलेला आहे अशा नागरिकांनी मनामध्ये भीती न बाळगता ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान शनिवारी सकाळी शहरातील यशवंत नगर भाग सील करण्यात आला. दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेऊन उमरग्यातील उपविभागीय महसूल अधिकारी तथा दंडाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर,पोलीस उपनिरीक्षक शिवदर्शन बिरादार, वैद्यकीय अधिक्षक वसंत बाबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यजित डुकरे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक हेमंत देशपांडे, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे आदींनी या परिसरामध्ये येऊन तात्काळ यशवंनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील संपूर्ण भाग सील करण्यात आला.
सदर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात येऊन जवळपास ५० घरांचे आरोग्य खात्याकडून थर्मल स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. सदर पॉझिटिव्ह रुग्ण हा मूळ भालके गल्ली प्रभाग क्रमांक सात मधील असून त्या रुग्णाच्या परिवारातील अनेक सदस्यांनी अन्य गावातील नागरिकांची संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने यासंदर्भात अधिक दक्षता घेऊन प्रभाग क्रमांक सातमध्ये लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून गावातील प्रत्येक चौकांमध्ये जनजागृती करणारे फलक लावून व पोलिस बंदोबस्त वाढवून यंत्रणा सज्ज झाली आहे.


