काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाने थैमान घातले आहे. शुक्रवार दि. 24 रोजी आलेल्या रिपोर्ट मध्ये आणखी चार कोरोनाबाधितांची भर पडली असून यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतील शिपायाचाही समावेश असल्याने संपर्कातील बॅंकेच्या ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.तर बॅंकेतील चारही कर्मचाऱ्यांना तपासणी करून येण्याच्या सुचना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आल्या आहेत. काटीत कोरोनाबाधितांची संख्या आता 13 वर पोहोंचली आहे. शुक्रवारी वाढ झालेल्या चारजणांच्या संपर्कातील 25 जणांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोंनटाईन करण्यात आले आहे.
दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने
गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार यांनी भेट देऊन गावातील पदाधिकाऱ्यांची येथील ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सावरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या काटीतील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील आरोग्य सेवक (MPW) काटीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना देखील सातत्याने गैरहजर राहत असल्याबाबत ग्रामस्थांच्या वतीने चेअरमन विक्रमसिंह देशमुख, उपसरपंच सुजित हंगरगेकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार यांचेकडे तक्रार केली असून तात्काळ दुसरा कर्मचारी आणि आणखी एक आरोग्य सेविका देण्याची मागणी केली. या बैठकीत आरोग्य सेवेत तत्परता नसल्याने आढावा बैठकीत नाराजीचा सुर उमटला. योग्य आरोग्य सेवा न दिल्यास व आरोग्य सेवेत समन्वय ठेवता येत नसेल तर ग्रामस्थांच्या हितासाठी वेगळा विचार करावे असा सुचक इशारा चेअरमन विक्रमसिंह देशमुख यांनी दिला. कोरोनाबाधितांमध्ये एका खासगी डॉक्टरचा व बॅंक कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे काटीकरांची घाबरगुंडी उडाल्याचे चित्र दिसत आहे.
आढावा बैठकी दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.अजित राठोड, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रा.प.सदस्य मकरंद देशमुख, सतीश देशमुख, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे, पत्रकार उमाजी गायकवाड, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.