तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी ते पिंपळा बु या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असुन त्या खड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
तामलवाडी ते पिंपळा बु या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन रस्त्यावरील खडी, डांबर, मुरूम निघुन गेल्याने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या निधीमधुन दीड की.मी. रस्त्याचे काम तुटक तुटक पद्धतीने करण्यात आले आहे. तेही काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने काही ठिकाणी रस्ता खचुन खडी निघुन गेल्याने खड्डे पडत आहेत. उर्वरीत रस्त्यापैकी तामलवाडी ते गंगेवाडीच्या लवणापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावरील खडी, डांबर, मुरूम निघुन जाऊन मोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले. या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातुन वाट काढताना दुचाकी, चारचाकी वाहनाना कसरत करावी लागत आहे. तामलवाडी गावातील चव्हाण नगर परिसरातील याच रस्त्यावर रस्ता खचला असुन मोठा खड्डा पडल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदरील रस्त्यावरील सिमेंट नळी मोकळी झाली असुन खड्ड्यामध्ये लहान मुले पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तरी संबधित लोकप्रतिनिधी यानी याकडे लक्ष देऊन हा रस्ता तात्काळ दुरूस्त करावा व उघडी पडलेली सिमेंट नळी बुजवुन घ्यावी अशी मागणी पिंपळा बु,तामलवाडी ग्रामस्थांमधुन होत आहे.