उस्मानाबाद, दि. 02 :- कृषि दिनानिमित्त नानाजी देशमुख ‍कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत अंबेजवळगा ता.उस्मानाबाद येथे 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात आला. या निमित्त दि. 1 ते 7 जुलै, 2020 या कालावधीत कृषि सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ  विकासचंद्र रस्तोगी, प्रकल्प संचालक, पोक्रा यांच्या हस्ते करण्यात झाला. त्यावेळी त्यांनी नानाजी देशमुख ‍कृषि संजीवनी सप्ताह जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

याप्रसंगी माहिती देताना पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी  या प्रकल्पामध्ये चांगल्या पध्दतीची  शेती नवीन तंत्रज्ञानासोबत कसे करता येईल. यासाठी शेतीशाळा घेण्यात येत आहेत. त्याच्याशिवाय शेतकऱ्यांच्या गटांच्या माध्यमातून  त्यांचे ‍ काही  व्यवसाय आराखडा असेल, त्यांना मदत करण्यात येत आहे. हवामान अनुकुल वाणांचे, उत्पादनासाठी सुध्दा या प्रकल्पातून मदत करण्यात येणार आहे. एकंदर गावाच्या ग्राम ‍कृषि संजीवनी  समितीच्या माध्यमातून हा प्रकल्पाचा संदेश आपण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. प्रकल्पांतर्गत निवडलेल्या प्रत्येक गावाचे सुक्ष्म नियोजन करुन गावातील दुष्काळ कायमस्वरुपी हटवण्यासाठी मृद व जलसंधारणाची कामे प्रस्तावित करायची आहेत, अशी माहिती दिली.

विजय कोळेकर, कृषि ‍विद्यावेत्ता पोक्रा,मुंबई यांनी बी.बी.एफ. वर पेरणी निंबोळी अर्क व हवामान अनुकुल तंत्रज्ञान याचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषि

विज्ञान केंद्राचे प्राचार्यांनी शेतीशाळा आयोजित करुन तूर व सोयाबीन पिकांचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक लेणेकर यांनी निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करुन ते वापरण्याचे फायदे सांगितले. अंबेजवळगा येथील सरपंच श्री. कुलकर्णी  यांनी पोक्रा योजना पुर्ववत सुरु करावी, अशी मागणी केली व झाडे लाऊन जगवणाऱ्या शेतकऱ्यांनाच यापुढे आर्थिक मदत द्यावी,अशी अभिनव संकल्पना मांडली. तालुका कृषि अधिकारी डी.आर. जाधव यांनी  पोक्रा अंतर्गत वैयक्तिक लाभाचे घटक व गटांसाठी लाभाच्या योजनाबाबत मार्गदर्शन केले. पोक्राचे प्रकल्प विशेषज्ञ सचिन पांचाळ यांनी अर्ज करण्याची प्रक्रिया व शेतीशाळा या बाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य श्री. शेरखाने यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याविषयी माहिती दिली व वृक्ष लागवडीचे महत्व विषद केले.

कार्यक्रमानंतर प्रकल्प संचालक यांनी पोक्रा योजना राबविलेल्या वडगाव जा. तालुका कळंब येथे भेट देऊन औजार बँक व विहिरीची पाहणी केली. तसेच रुई ढोकी ता. उस्मानाबाद येथे शेतीशाळा प्लॉटला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. उपविभागीय कृषि अधिकारी,उस्मानाबाद यांनी प्रकल्पांतर्गत सध्या सुरु असलेल्या कार्यक्रमाविषयी  माहिती  दिली. कृषि उपसंचालक अभिमन्यू काशीद यांनी निंबोळी अर्क मोहिमेबद्दल माहिती दिली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बजरंग मंगरुळकर यांनी कृषि संजिवनी सप्ताहाचे आयोजन प्रत्येक गावामध्ये केले जाणार असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल सारडे यांनी केले. कृषि सहाय्यक माजिद शेख, अजित चव्हाण व कृषि पर्यवेक्षक दत्तात्रय बनसोडे, समुह सहाय्यक भक्ती भालेराव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले.

 
Top