तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील लहान भुयारी मार्गामध्ये पावसाचे पाणी पडत असल्याने भुयारी मार्गातील पाण्याच्या गळतीमुळे या मार्गाला धबधब्याचे स्वरूप आले असुन त्यामध्ये पाणी साचत असल्याने नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सोलापूर ते धुळे हा राष्ट्रीय महामार्ग तामलवाडी गावच्या मध्यभागामधुन गेला असुन एका बाजुला सर्व शासकीय कार्यालये ,शाळा तर दुसर्या बाजुला सर्व प्रार्थनास्थळे असल्याने दोन्ही बाजुच्या नागरीकांना ये - जा करण्यासाठी गावामध्ये एक मोठा व एक लहान असे दोन भुयारी मार्ग बनवले आहेत.मोठ्या भुयारी मार्गातील लाईट बंद असल्याने महीला,अबाल ,वृद्ध यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.तसेच शिवरत्न नगर येथे लहान भुयारी मार्ग असुन महामार्गावर पडलेले पावसाचे पाणी सरळ भुयारी मार्गात पडत असल्याने भुयारी मार्गाला पाण्याची गळती लागली आहे. पावसाचे पाणी एवढे जोरात आतमध्ये येत आहे की जणू भुयारी मार्गात छोटा धबधबाच तयार झाला आहे.तेच पडणारे पाणी भुयारी मार्गात साचत असल्याने नागरीकांना ये -जा करण्यास अडचण निर्माण होत आहे.तसेच हे पाणी आतमध्ये पडत असल्याने नागरीकामध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन नागरीक जीव मुठीत घेऊन ये जा करत आहेत.महामार्गाचे काम केलेल्या आय आर बी चे संबधित वरीष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे व पुढील संभाव्य धोका टाळावा अशी मागणी ग्रामस्थांमधुन होताना दिसत आहे.
