काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी व तुळजापूर येथील हॉटेल व्यावसायिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कातील त्यांची 45 वर्षीय पत्नी, 31 वर्षीय मुलगा आणि एका 29 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सावरगावकरांची चिंता वाढली असून त्यांचा पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मुलाचा साडू काटी येथे असून काटी येथील बॅंकशेजारी त्याचे घर आहे.
बॅंकेच्या कामासाठी आल्यानंतर काटीतील साडुच्या घरच्या मंडळींचा संपर्क आल्यामुळे साडूच्या घरच्या चार जणांना तुळजापूर येथे कोरोंनटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे काटीकरांचीही धाकधूक वाढली असून त्यांच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले असून येथील ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुरुवार दि.16 ते रविवार दि. 19 पर्यंत या चार दिवसांसाठी जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. तसेच गावात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून बसस्थानकाकडील एकच मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे.