मुरूम, दि. ३ : उमरगा तालुक्यातील बेळंब येथील तलाठी कार्यालयाचे बांधकाम झालेले आहे. परंतु गेल्या पाच-सहा वर्षापासून हे तलाठी कार्यालय सुरु न झाल्याने या कार्यालयाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील इतर गावांमध्ये नवीन बांधलेल्या तलाठी कार्यालयाचे कामकाजही सुरू झाले आहे. पण बेळंब येथील हे कार्यालय तलाठ्याने ताब्यात न घेतल्याने सध्या तलाठी कार्यालयाची अवस्था बिकट होऊन घाणीचे साम्राज्य वाढून इथे दुर्गधी पसरत आहे. या इमारतीचा अवैध कामासाठी उपयोग घेतला जात असल्याचे समजते.


 सदर कार्यालयाचे गुतेदाराकडून बांधकाम निकृष्ट पध्दतीने झाले आहे. या कार्यालयातील सर्वच टाईल्स फुटलेल्या, टाईल्सच्या खाली बेड काँक्रीट नसल्याने फरशी खालीवर झाली असून फक्त वाळूवरच टाईल्स बसवल्या गेल्याने फरश्या उचलल्या आहेत. त्यामुळे सर्व टाईल्स फरश्या व स्टाईल्स फुटून गेल्या, दरवाजे देखील निकृष्ट बसवले गेले आहेत. इथल्या एकाही खिडक्यांला काचे शिल्लक राहिले नाहीत. इलेक्ट्रिक वायरींगही खराब होऊन पडली आहे. सदर कार्यालय बांधकाम तहसीलच्या ताब्यात आहे की, ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. हेच कळायला मार्ग नाही. काही विकृत मनोवृत्तीचे लोक तर या इमारतीचा वेगळ्याच कामासाठी उपयोग घेताना दिसून येत आहेत.



 या इमारतीचे उद्घाटनही झाले नाही तर ही अवस्था झाली आहे. ही इमारत ताब्यात न घेतल्यामुळे ही अवस्था निर्माण झाली आहे. या इमारतीकडे इतके दुर्लक्ष कोणी केले याची चौकशी व्हायला हवी. सदर बांधकामाच्या दुरूस्तीकडे लक्ष घालून नवीन तलाठी कार्यालयाचे कामकाज ताबडतोब सुरु करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांमधून होताना दिसून येत आहे. नागरिकांना तलाठी कार्यालयात प्रशासकीय कामासाठी जा ये करणे सोईचे होईल.


 
Top