काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार दि. 23 रोजी येथील ग्रामपंचायत आवारात  तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस तुकाराम काळे,सपोनि सुबोध जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या  व बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर काटीतील मुस्लिम बांधव आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टिंक्शनचे पालन करीत आढावा बैठक घेण्यात आली.

 यावेळी मार्गदर्शन करताना तामलवाडी पोलीस ठाण्याचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम काळे म्हणाले की, यंदा कोरोना संसर्गजन्य रोगाने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत सर्व सण अतिशय साधेपणाने साजरे केले, यापुढेही कोरोना व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होणे धोक्याचे असून मुस्लिम बांधवांचा पवित्र समजला जाणारा बकरी ईद सण साधेपणाने साजरा करुन ईद निमित्त सामुहिक नमाज पठण करू नये,मास्कचा नियमित वापर करावा,गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन प्रशासन आणि पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे त्यांनी यावेळी केले. यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सुजित हंगरगेकर, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, करीम बेग यांनी काटीत अवैध दारू विक्री जोरात सुरू असून अवैद्य दारु विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करुन अवैद्य दारु विक्रीस आळा घालावा अशी मागणी केली. यावर काटीतील अवैद्य दारु विक्रीस लवकरच चाप लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

 तत्पुर्वी त्यांनी येथील प्रसिद्ध जामा मज्जिद व पुरातन निलकंठेश्वर मंदीरास भेट दिली.  यावेळी सपोनि तुकाराम काळे, सुबोध जमदाडे, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, उपसरपंच सुजित हंगरगेकर, तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, प्रदीप साळुंके, तन्वीर काझी, अतुल सराफ, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख,अनिल बनसोडे, बाळासाहेब भाले, हेरार काझी,करीम बेग, भैरी काळे,नजीब काझी, सिकंदर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top