(संग्रहित छायाचित्र)

नळदुर्ग, दि. 8 : येथील सांस्कृतीक, प्राचीन व ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी पर्यटकांसह नागरिकातुन होत आहे. जवळपास चार महिन्यांपूर्वी पासून कोरोनामुळे नळदुर्गचा भुईकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे किल्ल्यावर अवलंबून असणा-या उदयोग-धंद्याना फटका बसल्याने त्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्याचबरोबर किल्ल्यातील कामगार बेरोजगार झाले आहेत. त्याकरीता किल्ला पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुला करण्याची गरज आहे.


सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्याने राज्यातील ऐतिहासिक , पर्यटन व धार्मिक स्थळे,  पर्यटक व भाविकांसाठी बंद केले होते. नळदुर्गचा इतिहास प्रसिध्द किल्लाही दि. 17 मार्च  रोजीपासुन पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.  किल्ल्याच्या इतिहासात प्रदीर्घ काळ किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनामुळे लागू केलेला लॉकडाऊन आता उठविण्यात आला असून सध्या अनलॉक झोन सुरु आहे. या अनलॉक मध्ये जे कठोर नियम व अटी होत्या. त्यामध्ये मोठया प्रामणात शिथिलता देण्यात आली असून अनलॉक मध्ये शिथिलता दिल्यानंतर आज जवळपास बोटावर मोजण्या इतके व्यवहार सोडले तर सर्व व्यवहार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दि. 8 जुलै पासून राज्य सरकारने राज्यांतील हॉटेल व लॉर्जिंग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बंद पडलेले व्यवसाय व व्यवहार आता हळूहळू सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र अदयापही शासनाने राज्यांतील पर्यटन व धार्मिक स्थळे, पर्यटक व भाविकांसाठी खुले करण्यांसदर्भात कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे ही स्थळे कधी उघडली जाणार हे निश्चित नाही.

 पावसाळयात हा विलोभनिय किल्ला पाहण्यासाठी देशभरातुन पर्यटक गर्दी करतात. नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळयात लाखो पर्यटक नळदुर्गच्या या ऐतिहासिक भूमीत येतात. या पर्यटकांमुळे किल्ल्यावर अवलंबून असणा-या घटकांना चांगले दिवस येतात. मात्र सध्या किल्ला बंद असल्यामुळे किल्ल्यावर अवलंबून असणा-या सर्व घटकांचे सध्या हाल सुरु आहेत. सध्या हा किल्ला राष्ट्रीय स्मारक संगोपन योजनेंतर्गत सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन कंपनीच्या ताब्यात आहे. युनिटी कंपनीने किल्ल्यात केलेल्या कामामुळे या ऐतिहासिक किल्ल्यात ख-या अर्थाने गतवैभव प्राप्त झाले आहे. सप्टेंबर महिन्यात किल्ल्यातील ऐतिहासिक, नेत्रदीपक व प्रेक्षणीय नर-मादी धबधबा तसेचव शिलक धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात होते. हे धबधबे वाहत असताना पाहण्यासाठी लाखो पर्यटक किल्ल्यात दाखल होतात. मात्र सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता हा किल्ला पर्यटकांसाठी केंव्हा खुला होणार हे सांगता येत नाही. मात्र सध्या सरकार कोरोनाची अशी परिस्थिती असतानाची आज सर्वच व्यवसाय व्यवहार सुरळीतपणे काही अटी व नियम घालून सुरु करीत आहे. त्यामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक किल्लाही लवकरच पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
Top