मुरूम, दि. ७ : उमरगा तालुक्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरात प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. आसपासच्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने मुरुम नगर परिषद व पोलीस प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मुुुुरुम ही एकमेव नगर परिषद अशी आहे की, अद्यापपर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही व यापुढेही सापडू नये म्हणून नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
नगर परिषद व पोलीस प्रशासनाकडून जनतेस खालील आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांसाठी चौका-चौकात फलकांवर सुचनाही लिहिण्यात आल्या असून प्रत्येक नागरिकांनी आधार/मतदान कार्ड सोबत बाळगावे, सहा फुटाचे अंतर ठेवून व्यवहार करावा, विनाकारण ग्रुपने, गाडीवर डबल शीट, वाहन परवान्याविना शहरात फिरू नये, व्यापाऱ्यांनी आपल्या वस्तूची विक्री ग्राहकाचे आधार/मतदान कार्ड पाहूनच करावी, तोंडाला मास्क लावणे, सोबत सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असून असे नियम तोडणाऱ्या नागरिकास प्रशासनाकडून कमीत-कमी दोनशे रुपयापासून ते एक हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा अनिताताई अंबर व पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर यांनी सांगितले. कोरोना आपल्या आसपास फिरत असल्याने संपूर्ण शहरातील नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. नगर परिषदेकडून स्पीकरद्वारे देखील आवाहन केले असून नगर परिषद व पोलीस कर्मचारी शहरात फिरत असल्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आळा बसल्याचे बोलले जात आहे.