काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णाचा राहत्या घरासमोरील बसस्थानक परिसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले असून तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार यांनी गावात भेट देऊन हा परिसर सील करण्यात आला आहे. कोरोना बाधित कुटुंबातील दहा सदस्य व रुग्णाच्या हॉटेलमधील दोन वेटर अशा बारा जणांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. हे कुटुंब कोण कोणाच्या संपर्कात आले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब घेतले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना देऊन कोरोनाबाधित रुग्ण तुळजापूर येथे हॉटेल व्यावसायिक असून थोडासा थकवा जाणवल्याने ते त्यांच्या मुळ गावी 26 जुनला सावरगाव येथे आले होते. परंतू आजारी असल्याने कुटुंबा व्यतिरिक्त कोणाच्या संपर्कात आले नसल्याने ही दिलासादायक बाब असल्याचे सांगितले.
येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सावरगाव येथे तीन दिवस जनता कर्फ्यू पुकारला असून अत्याअवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. बाचपल्ले, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, मंडळ अधिकारी बालाजी जगताप, अमर गांधले, ग्रामविकास अधिकारी एस.ए. कोठे, तलाठी आर.डी. अंदाने आदीजण उपस्थित होते.

