कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सोमवार दि. 20 जुलै रोजी सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ दूध पुरवठा आणि औषधांची दुकाने सुरु राहणार आहेत. दरम्यान ठाणे, पुणे-पिंपरी, पनवेल, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 

पालकमंत्री श्री. पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ आज बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वजण प्रयत्न करुया, कोरोना संकटाचा मुकाबला करुया', असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरकरांना केले आहे.

कोल्हापुरात येत्या सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यान, सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.

 
Top