काटी : उमाजी गायकवाड

रामायणाशी संदर्भ सांगणारे श्रीक्षेत्र तुळजापूर येथील घाटशीळ पावसाळ्यात अधिकच विलोभनीय दिसत आहे. हिरवाईने नटलेला हा  परिसर भाविक आणि पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गच्या काळात भाविक आणि पर्यटकांना या संधीला मुकावे लागत आहे.             

   भारतातील शक्ती देवतांच्या 108  शक्तीपीठापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत. आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पुर्ण पीठ असलेले कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र अनेक पौराणिक, ऐतिहासिक घटनांशी जोडले गेलेले आहे. बालाघाट पर्वत रांगेत वसलेले आई तुळजाभवानी हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पुर्णपीठ असून अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या  तुळजापूरातील प्रसिद्ध आई तुळजाभवानीच्या पायथ्याशी व बालाघाट डोंगररांगात  असलेला  घाटशिळ मार्गावरील डोंगर रांगाने पावसाळ्यात हिरवा शालू पांगरल्याने निसर्गसुंदर सौंदर्यांने बालाघाट डोंगर रांगातील घाटशिळ रोड दुरवरुन सर्वांचे आकर्षण ठरत आहे. नयनरम्य बालाघाट डोंगररांगातील श्री तुळजाभवानी मंदिरासह येथील उपदेवतांची मंदीरे, मठ, तीर्थकुंड पुरातन स्थापत्य शैलीची साक्ष देतात. तुळजापुरात आलेला भाविक असो वा पर्यटक; त्यांची पावले बालाघाट डोंगररांगेतील घाटशीळकडे न वळली तरच नवल! सीतेच्या शोधात निघालेल्या प्रभू श्रीरामचंद्रांना श्री तुळजाभवानी देवीने येथूनच मार्ग दाखविल्याची आख्यायिका आहे. निजामशाहीत या डोंगरावरुन टेहळणी केली जात असल्याचे सांगण्यात येते.


धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत तुळजापूरकडे येणाऱ्या प्रत्येकाला सर्वप्रथम घाटशीळचे दर्शन घडते. शहरालगत नागमोडी वळणाच्या रस्त्याने जाताना घाटशीळ सर्वांचे लक्ष वेधून घेते. पावसाळ्यात हिरव्यागार वृक्षांनी वेढलेला हा डोंगर अधिकच विलोभनीय दिसत आहे. डोंगरकड्यावरुन सर्वदुर हिरवीगार शेती, मध्येच असणारे शेततळे आणि माथ्यावर काळेकुट्ट ढग असे विलोभनीय दृश्य मोबाईल फोनच्या कॅमेरात कैद करण्याचा मोह या मार्गावरून जाणाऱ्यांना आवरत नाही. यावर्षी मात्र निसर्गाचे हे खुललेले सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी ना भाविक ना पर्यटक असे चित्र तुळजापूरात आहे.






 
Top