तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शनिवार दि. 22 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येथील सर्किट हाऊस मध्ये मंगळवारी दुपारी गणेश उत्सवा संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार सौदागर तांदळे ,पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे ,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
मुख्याधिकारी आशिष लोकरे म्हणाले की, यावर्षीचा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा गणेश उत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही याची सर्व मंडळांनी काळजी घ्यावी, गणेश मूर्ती ही चार फुटापेक्षा अधिक असणार नाही तसेच घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटांपेक्षा अधिक असू नये शक्यतो मूर्ती शाडूची असावी घरगुती गणपती साठी धातूची अथवा संगमरवरी मूर्तीची पूजा करावी व नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे असे सांगितले .
पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले की, सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच मंडळांनी एक गाव एक गणपती व एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबवावी .शक्य नसेल तर कमीत कमी मंडळांनी सार्वजनिक गणपती बसवावे कोणत्याही मंडळांना मिरवणुकीची परवानगी नाही अशी माहिती दिली.
नगराध्यक्ष रोचकरी म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग पाहता सर्व मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी मदत करावी. तुळजापूरचे गणेश उत्सवाचे अतिशय चांगले नाव आहे हे नाव कायम राहण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे. शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी नगर परिषदेतर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे या वाहनात शहरवासीयांनी गणपती आणून ठेवावे. या सर्व गणपतीचे विसर्जन नगर परिषद मार्फत केले जाईल. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
तहसीलदार सौदागर तांदळे म्हणाले की, सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिक रोषणाई न करता साधेपणाने मंडप मारून तसेच आरोग्य उपक्रम, रक्तदान शिबिर, अन्नदान व धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा करावा .कारण तालुक्यात संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगाची स्थिती अतिशय गंभीर आहे या साथी कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व मंडळांनी गर्दी टाळावी मोजकेच पदाधिकारी गणेश मंडपात ठेवावेत गर्दी होणार नाहीत असे कोणतेही उपक्रम घेऊ नये . अन्नदान करताना ते बंद पाकीटाद्वारे करावे शक्य झाल्यास मंडळांनी विलगीकरण कक्षातील रुग्णांना अन्नदान करावे यामुळे त्यांनाही गणेश उत्सव व गौरी पूजनाचा आनंद मिळेल असे सांगितले.
पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे यांनी यावर्षी कोरूना रोगाचे संक्रमण पाहता कोणत्याही मंडळाकडून प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही मंडळास गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीस परवानगी दिली जाणार नाही. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडपात गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जे मंडळ प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत ,कोणाचीही गय केली जाणार नाही असे सांगून सर्वांनी पोलीस प्रशासनास चांगले सहकार्य करून गणेश उत्सव आनंदात पार पाडावा असे आवाहन केले.
यावेळी सज्जनराव साळुंके, विशाल रोचकरी, नागेश नाईक, औदुंबर कदम, गुलचंद व्यवहारे, रणजीत इंगळे, राहुल खपले, आनंद कंदले, राजेश्वर कदम, इंद्रजित साळुंके, मिलिंद रोकडे, नळदुर्गचे सपोनि राऊत, पोलीस अधिकारी सुशील चव्हाण, राठोड, बीट अंमलदार कलशेट्टी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.