तुळजापूर, दि. 19 : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे हे होम क्वारंटाईन झाले आहेत. ॲड. काळे यांचे वडील व पुतण्या यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याची माहिती ॲड. अनिल काळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. दरम्यान, काळे यांच्या कुटूंबातील 8 सदस्यांची कोरोना चाचणी केली असता सर्वांचा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 

ॲड.  अनिल काळे यांनी फेसबुक वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझे वडील सुखदेव अण्णा काळे व पुतण्या अक्षय काळे हे दोघेजण कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले होते. माझो वडील अश्विनी रुग्णालय सोलापूर येथे उपचार घेत असून त्यांची प्रकृत्ती स्थिर आहे. तर पुतण्या तुळजापूर येथील 124 भक्त निवासात विलगीकरण कक्षात आहे. तुळजापूर तालुक्यात नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून अनेक गावामध्ये श्री तुळजाभवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेमार्फत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले आहे. तसेच ज्या गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्या गावामध्ये भेटीही दिलेल्या आहेत. त्यामुळे मी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. तसेच हाय रिस्क संपर्कातील माझ्या कुटूंबातील सर्व 8 सदस्यांना तुळजापूर येथील 108 कोविड सेंटर येथे विलगीकरण करून त्यांची कोरोना चाचणी केली असता सर्वांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाला न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन करुन सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायजर वापर करावे, आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.


 
Top