तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे शेतकरी राजाचा आवडता बैलपोळा हा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला.
शेतकरी राजाला वर्षानुवर्षे शेतीमध्ये साथ देणारा त्याच्या सोबत शेतामध्ये राबुन कष्टाची भाकरी देणारी सर्जा - राजाची बैलजोडी या बैलांना सजवुन मोठ्या थाटामाटाने ढोलताशाच्या गजरात गावामधुन मिरवणुक काढुन बैलांना पुरण पोळीचा घास भरवुन साजरा करण्यात येणारा बैलपोळा सणावर यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे बैलपोळा हा सण साधेपणाने साजरा करण्यात आला.बैलांना पिवळ्या रंगाने रंगवुन त्यामध्ये विविध रंगाचे ठिपके देण्यात आले होते. शिंगाना बेगड लावुन त्यांना रंगीबेरंगी फुगे बांधुन बैलांच्या गळ्यामध्ये अनेक घाटी असणारी चंघाळी घालण्यात आली होती.बैलांच्या चारही पायामध्ये तसेच पाठीवर काळा धागा बांधुन तसेच पाठीवर झुली टाकुन बैलांना सजवण्यात आले परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने बैलजोडींना ग्रामदैवत श्री विष्णु महादेव मंदीर पायरीजवळ नेऊन दर्शन करविले व कुटुंबासमवेत घरासमोर बैलजोडीचे पुजन करून बैलांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला.यंदा पिकांसाठी पाऊस समाधानकारक झाला असला तरी कोरोनाने सर्व काही जागेवरच थांबवले असल्याने बैलपोळा हा सणही कोणतेही वाद्य न वाजवता शेतकरी बांधवाने अगदी साधेपणाने साजरा केला आहे.