लोहारा : तालुक्यातील मुख्य पीक सोयाबीन वरील कीड रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुका कृषी अधिकारी लोहारा यांच्यावतीने शेतकऱ्यांमध्ये कीड रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी कृषी रथ तयार करण्यात आला आहे कृषिरथ तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन सोयाबीन वरील कीड रोगाविषयी जनजागृती करणार आहे ..
तरी आज दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजी मौजे हराळी येथून कृषी रथाचे पूजन सौ हेमलताताई रणखांब सभापती पंचायत समिती लोहारा,तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे, प्रगतिशील शेतकरी नितीन सूर्यवंशी व श्रीमती रंजनताई हासुरे यांच्या हस्ते करून कृषि रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. सदर कार्यक्रमादरम्यान गावातील शेतकरी कृषी विभागातील सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी हजर होते.
कृषीरथ तालुक्यातील गावोगावी जाऊन माहितीपुस्तिका, ध्वनीसंदेश याद्वारे जनजागृती करणार आहे. सदर कृषी रथाचे नियोजन कृषी सहाय्यक श्री शैलेश जट्टे श्री नागेश जट्टे यांनी केले.
सोयाबीन वरील किडीच्या नियंत्रणासाठी
फ्लूबॅंडामाईड (३९.३५% मार्केट नाव टाकूमी किंवा फेम) २ मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा थायोमिथॉक्झांम (१२.६%)+ लॅमडासायलेथ्रीन (९.५%) (मार्केट नाव आलीका) हे संयुक्त कीटकनाशक 2 मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी( पावर पंपाने फवारणी करताना औषधाचे प्रमाण अडीच पट वापरावे).
यासोबतच सोयाबीन पिकावर व शेंगावर बुरशी किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास टेबुकोनाझोल१०% + गंधक ६५% या संयुक्त बुरशीनाशकाची 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
सद्यस्थितीत तालुक्यातील सोयाबीन या पिकाची परिस्थिती चांगली दिसून येत आहे परंतु मागील पाच दिवसापासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि उद्या असणाऱ्या अमावस्यामुळे सोयाबीन या पिकावर पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणारी अळी चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याअनुषंगाने सोयाबीन वरती लवकरात लवकर फवारणी करावी, असे आव्हान मिलिंद बिडबाग, तालुका कृषी अधिकारी लोहारा यांनी केले आहे.
लोहारा तालुक्यातील खरीप पेरणी खालील प्रमाणे -
खरीप ज्वारी-६१३, मका-५२३, तूर-५८९७, उडीद-४१४०, मूग-२८२५, सोयाबीन-२७८८७, इतर-६७२ एकूण-४२२५३ क्षेत्रावर पेरणी झाली आहे.