बार्शी, दि. 18 : प्रशासनाने पक्षविरहित बैठक घेवून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. ज्यांच्याकडून संसर्गाचा धोका आहे, त्यांची प्राधान्याने चाचणी करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. यापूर्वीही झालेल्या प्रयत्नांचा योग्य तो संदेश गेला नाही. फेरीवाले ते मोठे व्यापारी असे ५ ते ६ हजार व्यापारी आहेत त्यांची तपासणी करून ज्यांना लागण झाली त्यांना वेगळे केले तरी नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी यातून मोठे काम होणार असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील विविध व्यापाऱ्यांना एकत्र बोलावून कोरोनाच्या चाचणीबाबत पूर्वसूचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने सोमवारी दि.१७ रोजी सायंकाळी स्व.यशवंतराव चव्हाण सांस्क्रतिक भवन येथे संयुक्त बैठक घेण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.ढगे, नगराध्यक्ष अॅड.असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नगरसेवक भैय्या बारंगुळे, महेश जगताप, सुभाष लोढा, विलास रेणके, वर्षा रसाळ आदि उपस्थित होते. याप्रसंगी व्यापारी योगेश अग्रवाल, विनोद चोप्रा, सुलाखे आदींनी व्यापाऱ्यांच्या अडचणी सांगीतल्या, त्या सोडविण्याबाबत मुख्याधिकारी यांनी सकारात्मकता दर्शवली.
ज्या व्यापाऱ्यांची तपासणी होणार त्यांची वर्गवारी करून त्यांना अगोदरच पूर्वसूचना दिल्या जातील. एकाच वेळी सगळ्यांना बोलवायचे असे होणार नाही तर त्याचे योग्य नियोजन होणार आहे. सुरूवातीला थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे परंतु त्यानंतर त्यातील त्रुटींची दुरूस्ती होणार आहे. करोनाने कोणाचा जीव जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. चाचण्यांची संख्या दररोज किमान दोनशे होतील असे नियोजन आहे. काही शंका असतील तर त्या दूर केल्या जातील, या तपासणीसाठी पैसे लागणार ही मोठी शंका व्यापाऱ्यांच्या मनामध्ये होती ती आता गेली आहे. या चाचणीसाठी व्यापाऱ्यांना कसलेही पैसे लागणार नाही. शासन सर्व खर्च करत आहे, आपण जगलो तरच पुढे सर्व उपभोग घेवू शकू त्यामुळे स्वत:च्या जीवाची काळजी म्हणून तरी त्यांनी याकामी पुढे येणे आवश्यक आहे.
डॉ.ढगे म्हणाले, सर्व छोटे मोठे व्यापारी, हातगाडीवाले, भाजीपाला विक्रेते यांचा थेट संपर्क येतो, त्यांची चाचणी करणे हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्यापासून इतरांच्या आरोग्याला धोका न होण्यासाठी आवश्यक आहे. यापूर्वी सर्व व्यापाऱ्यांची नोंदणी होणार आहे. त्यांचे नाव, वय, लिंग, पत्ता, संपर्क क्रमांक आणि आधार क्रमांकाची नोंदणी केली जाणार आहे. जास्त संपर्क येणारे अगोदर आणि कमी संपर्क येणारे नंतर तपासणी केले जाणार आहेत. व्यापाऱ्यांसोबत त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचीही तपाणी होणार आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ही चाचणी होणे गरजेचे आहे. दररोज रॅपीड अँटीजेन टेस्टचा वापर करून किमान दोनशे जणांची चाचणी केली जाणार आहे. पॉझीटीव्ह आल्यानंतर कोणताही त्रास नसलेल्या त्यांची घरी सर्व सोय असेल तर तो पर्याय उपलब्ध होणार आहे. यासाठी त्यांच्याकडे वेगळी खोली, घरी तो काळजी घेवू शकत असेल, त्यांच्या घरातील व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सक्षम असतील तर त्यासाठी परवानगी मिळेल. पॉझीटीव्ह आलेल्यांना व त्यांच्यासंपर्कातील आलेल्या व्यक्तींसाठी कोरोनासाठी आवश्यक क्वारंटाईन, आयसोलेशन इ.सर्व नियमांचे बंधन पाळावे लागतील. अंतर ठेवणे, मास्क, साबण अथवा सॅनीटायझरचावापर केल्यास नागरिकांना संसर्गापासून दूर राहणे शक्य आहे.