तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत बोगस मजुराच्या नावे काम न करता पैसे उचलुन गैरप्रकार करणारे पंचायत समिती सदस्य व काही अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यानी दि. १७ रोजी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील विहीर गायब प्रकरण ताजे असतानाच तामलवाडी येथुन आता रस्तेही गायब होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन ठप्प झाल्याने अनेक गरीब कुटूंबावर उपासमारीची वेळ आली या गरीब कुटुंबाच्या हाताला काम मिळुन रोजीरोटीचा प्रश्न सुटेल या हेतुने जिल्ह्याचे पालकमंत्री,खासदार,आमदार यानी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मंजुर करून आणली. तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथेही संबंधितांचे दोन शेतरस्ते तसेच एका पाझर तलावाचे काम अशी जवळपास अंदाजे २५ लाख रूपयाच्या कामास माहे मे व जूनमध्ये अर्थिक व तांत्रिक मंजुरी मिळाली. परंतु गरिबांच्या हाताला काम न देता संबंधित पंचायत समिती सदस्याने काही अधिकारी, रोजगार सेवक यांना हाताशी धरून तीनही कामावर बोगस मजुर दाखवुन मजुराच्या नावावर लाखो रुपये उचलल्याचा आरोप करुन निवेदनात पूढे म्हटले आहे की, रस्त्यावर मशीनच्या सहाय्याने कुठं कुठं थोडाफार मुरूम टाकला असल्याचे दिसुन येत आहे. परंतु व्यंकट रामपुरे ते रमेश म्हेत्रे हा रस्ता वादग्रस्त व न्यायप्रविष्ठ असल्याने संबधित शेतकर्यांनी स्वतः स्वखर्चाने तो रस्ता तयार केला असल्याचे तेथील शेतकर्यांनी सांगितले तर पाझर तलावातील टोपलीभरसुध्दा माती काढलेली नाही. या तीनही कामावर बोगस ६२ मजुर दाखवुन कामे चालु असल्याचे दाखवुन सबंधित सदस्याने काही अधिकारी व रोजगार सेवक यांच्याशी संगनमत करून गैरप्रकार केला असल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच संबधित रोहयो कामाची चौकशी करून गैरप्रकार करणारे पंचायत समिती सदस्य व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा अशायाची मागणी शिवाजी सावंत यानी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, पालकमंत्री शंकरराव गडाख,जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विहीर गायब प्रकरणी तामलवाडीच्या सरपंचाला पायउतार व्हावे लागले आता पंचायत समिती सदस्यावर काय कारवाई होणार? याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.