चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारातील सब लाइन विद्युत पुरवठा करणारा पोल झुकल्याने धोका निर्माण झाला आहे. या पोलच्या ओडणी पूर्णपणे निकम्या झालेल्या आहेत. महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारातील बिराजदार डेपो ते पाटील शेत यादरम्यान जाणाऱ्या चार ते पाच सबलाइन पोलच्या तारा व पोलच्या ओडणी पूर्णपणे निकामी झालेल्या आहेत. यामुळे पूर्ण लाईन कोलमडून पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकरी जनावराच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कल्पना देऊनही दुरुस्ती होत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांतुन होत आहे. तसेच महावितरण अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार देऊन दोन महिने झाले तरी अजूनही याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. अत्यंत महत्त्वाचा असलेला या विद्युत लाईनकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने सबलाइन पोल दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधवातुन होत आहे.
पोलची दुरुस्ती करावी
मी दोन महिने पूर्वी लेखी तक्रार अणदूर अभियंत्याकडे दिली होती. मात्र कोणीही लक्ष दिले नाही. तसेच विद्युत् पोल झुकल्याने यांच्या तारा परिसरातील शेतामध्ये पडुन जिवीतास व पिकांची नुकसान होण्याची भीती आहे. विद्युत प्रवाह व घर्षणामुळे तारांमध्ये स्पार्क होते त्यामुळे परिसरातील व माझ्या शेताला धोका आहे. तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा पोल दुरुस्त करावा.
- दिपक विजय पाटील, शेतकरी, चिवरी