नळदुर्ग, दि. 15 : दिवसेंदिवस संसर्गजन्य कोरोना आजार पसरत असून आगामी काळात होवू घातलेला गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून साजरा करण्याचे आवाहन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी शनिवार (दि. 15) रोजी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
नळदुर्ग येथील पोलीस ठाण्यात शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सपोनि जगदीश राऊत, सपोनि एस.बी. मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सपोनि राऊत पुढे म्हणाले की, श्री चे प्रतिष्ठापना झाल्यानंतर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने दिवसांतून दोन वेळा जंतूनाशक औषध फवारणी करावे, कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर पाळावे, गर्दी करु नये, मंडळानी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भावनेने सर्वसामान्यांसाठी विधायक उपक्रम राबविण्याचे सांगून श्री चे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना मास्क वाटप करावे, सॅनिटायजरचेही उपयोग करावे, त्याचबरोबर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
या बैठकीस भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, नगरसेवक बसवराज धरणे, माजी नगरसेवक संजय बताले, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले, माजी उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शाम कनकधर, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, लतीफ शेख, आय्युब शेख, विशाल डुकरे, नगरपालिकेचे मुनीर शेख, खलील शेख, विजय डुकरे, संदिप गायकवाड, कल्पना गायकवाड मेंडके यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पो.का. धनंजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. तर आभार सपोनि राऊत यांनी मानले.