तुळजापुर : कुमार नाईकवाडी
श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी मातेस अर्पण करण्यात आलेल्या विविध वस्तुंचा गुरुवार दि. 20 रोजी जुन्या प्रशासकीय कार्यालयात जाहीर लिलाव करण्यात आला. सदरचा लिलाव सरकारी बोलीप्रमाणे सुरू होऊन तीन बोलीनंतर अंतिम करण्यात आला. या लिलावात एकूण पंधरा व्यापारी बोली धारकांनी सहभाग घेतला होता. यातुन 7 लाख 30 हजार 570 रुपयांचे श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानास उत्पन्न प्राप्त झाले.
श्री तुळजाभवानी मातेस अर्पण केलेल्या वस्तुमध्ये पितळ वस्तुच्या स्वरुपात 5 लाख 81 हजार 250 रुपये, तांबे वस्तुच्या स्वरुपात 66 हजार रुपये, स्टील वस्तुच्या स्वरुपात 29 हजार 520 रुपये, लोखंड व प्लास्टिक वस्तुच्या स्वरुपात 17 हजार रुपये, आरसे व प्रतिमाच्या स्वरुपात 11 हजार 300 रुपये, विद्युत साहित्याच्या स्वरुपात 25 हजार 500 रुपये असे एकुण 7 लाख 30 हजार 570 रुपये श्री देवीजीस अर्पण केलेल्या वस्तुच्या रक्कमेतुन श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानास उत्पन्न मिळाले, अशी माहिती श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिली.
यावेळी लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, महेंद्र आदमाने, जयसिंग पाटील, कर्मचारी सातपुते, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्यासह बोली धारक व्यापारी उपस्थित होते.