उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनी चाकु हल्ला केलेला आरोपी तात्पुरत्या जेलमधून पसार झाला होता. अखेर सोमवारी रात्री उशिरा तो एका मंदिरात सापडला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
गत विधानसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर हे पडोळी-नायगाव येथे प्रचार करत होते. त्यावेळी गर्दीतून आलेल्या एका तरुणाने हात मिळवत त्यांच्या पोटावर दुसऱ्या हाताने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला होता. पण ओमराजेंच्या घड्याळावर चाकूचा वार बसल्याने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. त्यानंतर पोलीसांनी आरोपी अजिंक्य टेकाळे यास अटक केले होते. दरम्यान, आरोपीस उस्मानाबादच्या डीआरसी रोडवरील तात्पुरत्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यास वैद्यकीय तपासणीसाठी सोमवारी सकाळी जिल्हा रुग्ण्यालयात आणण्यात आले होते. तेथून परत जेलमध्ये आणल्यानंतर तो पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळाला होता. त्यानंतर पोलीसांनी त्याचा शोध घेतला असता सोमवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास शिंगोली येथील हनुमान मंदिराजवळून आरोपी टेकाळे यास पोलीसांनी ताब्यात घेतले.