कधी भरणार शाळा....!
ओसाड पडले मैदान सारे
अबोल झाला फळा
सांगा ना गुरुजी
कधी भरणार हो आपली शाळा...
गरीबीचं जीनं माझं
नाही आमच्याकडं मोबाईल
सांगा गुरुजी तुम्हीच आता
माझ्या शिक्षणाचं कस होईल
मोबाईलवाले मित्र जवळपण येऊ देत नाहीत मला
सांगा ना गुरुजी......
बर झालं टीली टीली आलं
टीव्ही पाहण्यासाठी मी
शेजारच्या काकूचं धुणभांडी केलं
त्यांच्या शेंबड्या बारक्या
पोराला कडेवर घेवून लावतोय लळा
सांगा ना गुरुजी...
बाप जातो कामाला
आई जाते शेतात
दररोजच्या पोषण आहाराचा
भात नाही पडत पोटात
तहानलेल्या भुकेलेल्या मनानं
तुम्ही शिकवलेल्या कवितेस लावतोय गळा
सांगा ना गुरुजी...
तुम्हीच म्हणाला होता गुरुजी
शिक्षणानं माणूस होतो खूप मोठा
आताच्या बंद शिक्षणानं किती होतो
माझ्या शिक्षणाचा तोटा
आपण लावलेल्या परसबागेचा
कधी फुलणारं हो मळा
सांगा ना गुरुजी....
खेळ गाणी गप्पा गोष्टी
विसरुन जात आहे सारं सारं
शाळे भोवताली त्या गाजर
गवतानं धरलाय मोठा फेरा
सुंदर आदर्श आपल्या शाळेचं
भकास रुक्ष रुप दिसतं मला
सांगा ना गुरुजी....
गुरुजी खुप मोठया आशेने मी
काल शाळेकडे गेलो
पण शाळेची झालेली दुर्दशा
पाहून खूपच रडवेला झालो
आपण लावलेल्या अशोक व पिंपळाच्या
झाडाला पाणी घालताना
कित्येकदा गहिवरलो
मैदानात पडलेल्या काडी कचरा
पत्त्याची पाने दारुच्या बाटल्या
उचलून पालापोचाळा केला गोळा
सांगा ना गुरुजी....
दगड गोटे, विटाचे तुकडे वेचले सारे
कागदाचे गोळे कुरकु-याचे पाऊच
गोळा करताना त्रास देत होते भयानक वारे
गुरुजी या टोकापासून ते त्या टोकापर्यंत
झाडून स्वच्छ केली मी शाळा
सांगा ना गुरुजी....
कधी वाजेल आपल्या शाळेची घंटा
निनाद येईल माझ्या कानी
सोन्याचा तो मंगल दिन लवकर येवो
आम्हा वंचीत आदिवासी बालका जीवनी
लॉकडाऊन संपण्याची वाट बघतोय देऊन डोळा
सांगा ना गुरुजी.....
- कवी अरुण कांबळे,
उस्मानाबाद