तुळजापूर, दि. 18 : तुळजापुर शहरात दुचाकीस्वारांकडून सर्व कागदपत्रे असताना व नियमाप्रमाणे वाहतूक करत असताना विनाकारण होणारी आर्थिक लूट थांबविण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तुळजापूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या चौकात काही अधिका-यांकडून दुचाकीस्वारकांकडून विनाकारण कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता त्यांना बेकायदेशीरित्या भोगस व नियमाचे उल्लंघन करून गैरप्रकारे ऑनलाईन दंड लावण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप करुन निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या देशासह राज्यात कोरोनाचे सावट असतानादेखील काही अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे दंड लावण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करून नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यात यावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष जुबेर शेख यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाची एक प्रत माहितीस्तव राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू, उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक तुळजापूर यांना देण्यात आल्या आहेत.