उस्मानाबाद, दि. 11 : कोविड- 19 चा संसर्गास अटकाव व्हावा या उद्देशाने जिल्हाभरात तपासणी नाके, प्रतिबंधीत क्षेत्रे, इस्पीतळ बंदोबस्त याकामी उस्मानाबाद पोलीस दलाचे अधिकारी- कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान अहोरात्र तैनात आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व शाखा, पोलीस कार्यालये येथे असणाऱ्या सर्व पोलीसांची रॅपीड ॲन्टीजेन तपासणी करण्यात येत आहे.
यात कोविड- 19 बाधीत आढळल्यास त्यांच्या उपचाराकरीता तसेच क्वारंटाईन कक्षा करीता तुळजापूर येथील साप्ताहीक बाजार परिसरात असणाऱ्या मंदीर संस्थानच्या भक्त निवास ईमारती मधील तिसरा मजला राखीव ठेवण्यात आला आहे. तेथे त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्याकरीता वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आज पर्यंत उस्मानाबाद पोलीस दलातील 2 अधिकारी, 10 पोलीस कर्मचारी व 2 पोलीस कुटूंब सदस्य कोविड- 19 मुक्त झाले असुन एक पोलीस कर्मचारी मयत झाला आहे. सध्या 3 पोलीस अधिकारी, 31 पोलीस कर्मचारी, 6 कुटूंबीय व 2 गृहरक्षक दल जवान असे उपचार घेत आहेत.