काटी : उमाजी गायकवाड
उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यच्या सिमेवरील तुळजापूर तालुक्यातील काटी येथील देशमुख बंधूनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवत उस्मानाबाद जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण करून मराठी माणूस देखील चांगला उद्योजक बनू शकतो, हे सिद्ध करून दाखवले. काटी येथील अमरसिंह बाजीराव देशमुख, संजय बाजीराव देशमुख, विजयसिंह बाजीराव देशमुख व काटी येथे शेती करीत असलेले त्यांचे थोरले बंधू अजयसिंह बाजीराव देशमुख या भावंडांचा जीवनप्रवास खऱ्या अर्थाने थक्क करणारा आहे.
निजाम राजवटीपासून काटी या गावची ओळख तशी वतनदारांचे गाव म्हणूनच ओळखले जाते. याच देशमुख वतनदार घराण्यातील कै. बाजीराव व्यंकटराव देशमुख यांचा शेतीसोबतच विहिरीवरील इंजिन दुरुस्तीमध्ये सुध्दा हातखंडा होता. परंतु कालांतराने नैसर्गिक आपत्ती व कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे त्यांना 60 एकरपैकी 38 एकर शेती विकण्याची वेळ आली. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतीच्या उत्पादनात मोठी घट झाली. मोठा परिवार असल्याने दिवसेंदिवस आर्थिक चणचण भासू लागली. घरात अठराविश्व दारिद्र्य निर्माण झाले. थोरले बंधू अजयसिंह देशमुख हे शेती पाहत होते. परंतु शेतात उत्पन्न निघत नव्हते. कुटुंबातील लहान असलेले अमरसिंह व संजय यांना काय करावे काहीच सुचत नव्हते. दहावीची परीक्षा दिल्यानंतर लगेच अमरसिंह देशमुख, विजयसिंह यांनी धाकटे बंधू संजय देशमुख यांना घेऊन पुणे गाठले. पुणे येथे पडेल ते काम करीत हालअपेष्टा सहन केल्या.
संजय देशमुख यांनी स्प्रे पेंटींग दुकानात काम करीत होते तर विजयसिंह देशमुख हे पुण्यात इलेक्ट्रिक दुकानात कामाला होते. तर अमरसिंह यांनी पुण्यात यश एंटरप्राईजेस मध्ये अवघ्या 150 रुपये महीना पगारावर काम केले. या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली.
पुण्यात काम करत असताना आपण नौकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचे व आपणही उद्योजक बनायचे असा विचार यायचा मात्र घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे लगेच व्यवसाय करणे शक्य नव्हते. परंतु म्हणतात ना मानसाच्या मनात जिद्द व परिश्रम घेण्याची उर्मी असली की, कोणतीही गोष्ट साध्य करता येते. याची प्रचिती पुण्याहून उस्मानाबाद मध्ये येऊन देशमुख बंधूनी दिली. त्यावेळी गुत्तेदारी करीत असलेले त्यांचे चुलते अनिल देशमुख यांच्या सल्ल्याने ते 1 जानेवारी 1993 साली उस्मानाबादेत आले व त्यांच्याच सल्ल्याने नगरपालिकेच्या जागेत पत्र्याचे शेड मारुन त्यांनी अॅल्युमिनियम खिडक्यांची कामे करण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी डॉ. शहापूरकर यांच्या दवाखान्याचे काम मिळाले. डॉ. शहापूरकर यांचेकडून दुकानासाठी एक गाळा घेतला. त्यानंतर उस्मानाबाद येथील राजासाब हॉटेलचे काम व अॅडव्हान्स हॉटेल मालक दिलीपराव देशमुख यांनी दिले.
पुढे उस्मानाबाद जिल्हा बॅंकेच्या अनेक शाखांची कामे मिळाली, लोकमंगल मल्टीस्टेट, श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट,यशदा मल्टीस्टेट, जनकल्याण मल्टिस्टेट,तेरणा बँक,यशवंत मल्टिस्टेट, तसेच ग्रामपंचायती, हॉस्पिटल्स, कॉलेमधील लॅब , कामे मिळत गेल्याने देशमुख बंधूचा उत्साह, आत्मविश्वास वाढला. व्यवसायासाठी जागा कमी पडू लागली अमरसिंह व संजय या दोन्ही बंधूनी उस्मानाबादेतील जिजाऊ चौकातील दंडनाईक कॉम्प्लेक्स मध्ये सहा दुकान गाळे भाडेने घेऊन सन ग्रृप या नावाने मोठे शो रुम सुरु केले.
दिवसेंदिवस उद्योग व्यवसाय वाढत असल्याने सन ग्रुपच्या नावाखाली सन अॅल्युमिनियम, सन सिरॅमिक, सन प्लाय, सन ग्लास व हार्डवेअर, सन पेंट, सन बिल्डींग मटेरियल्स, सन लाईट हाऊस अशा शाखा उभा केल्या आहेत. त्याच बरोबर तांबरी विभागात उंबरे कोठ्याजवळ स्वत:ची आठ हजार चौरस फुटांची जागा घेऊन भव्य असे शोरुम उभा करून या शोरुम मध्ये पुणे, मुंबई, दिल्ली, गुजरात, चेन्नई, उत्तरांचल, अरुणाचल प्रदेश येथील नामांकित कंपन्यांचा माल उपलब्ध असून सन ग्रुप नावाने तुळजापूर, लातूर, कुर्डुवाडी, अंबाजोगाई, वैराग या ठिकाणी शाखा सुरू आहेत. उस्मानाबाद येथील शो रुममध्ये यू. व्हि. सी. विंडो, अॅल्युमिनियम विंडो, पार्टीशन , डोअर, कंपोझिट पॅनलिंग, पिव्हीसी डोअर, फ्लश डोअर, टफन गलास,ग्लास डोअर,प्लाय वूड, हार्डवेअर, सेन्ट-गोबेन ग्लास, फ्लोरिंग टाईल्समध्ये आर.ए.के, स्वस्तिक, क्यूटन टाईल्स, किचनटाईल्स, बाथरूम टाईल्स व वॉश बेसिन, टब, जग्वार तोट्या, प्लंबिंगचे सर्व साहित्य , वॉलपेपर, पडदे , मॅटींग, ऑफिस फर्निचर,एकाच दालनात मिळण्याची सोय झाली आहे.
या उद्योग समूह व्यवसायाच्या माध्यमातून या दोन्ही बंधूनी उस्मानाबादेत 50 ते 60 युवकांना प्रशिक्षित करुन कायम स्वरुपी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तर विविध शाखांच्या माध्यमातून 100 लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. एकेकाळी दुसऱ्यांच्या व्यवसायात काम करणारे देशमुख बंधूनी काटी सारख्या ग्रामीण भागातून जावून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यच्या ठिकाणी स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारुन इतरांच्या रोजगाराचा प्रश्न मिटविला आहे. अमरसिंह देशमुख, संजय देशमुख व तुळजापूरातील विजयसिंह देशमुख हे तीन बंधू 100 कुटुंबांचे पोषणकर्ते बनले आहेत.
व्यवसायामध्ये अनेक नवनवीन प्रयोग करून ते यशस्वी केले ...
मराठी माणूस म्हटला की, आठ तासांची नौकरी करणारा, गणपती दिवाळीसाठी निश्चित गावाकडे जाणारा, गरजेपुरताच कमावणारा, मराठी माणूस धंदा करु शकत नाही ही ओळख देशमुख बंधूनी परिश्रमाच्या जिद्दीच्या जोरावर पुसून टाकली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशमुख बंधूनी घेतलेली उद्योग व्यवसायातील भरारी, त्यांची यशोगाथा नवउद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. गरीबीची जाण असल्याने सहाजिकच त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नुकतीच सनग्रृपचे सर्वेसर्वा अमरसिंह देशमुख यांची रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या जन्मभूमीतील असलेले नाते कधीही तुटू दिले नाही. सामाजिक कार्यातून संजय देशमुख यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवून त्यांनी 2013 ते 2017 पर्यंत पंचायत समिती सदस्यपद भुषविले. कै. बाजीराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, कामगारांचा गौरव आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. तर कोणत्याही कामगारास मुलगी झाली तर तिच्या नावाने ठराविक रक्कम या दोन बंधू मार्फत फिक्स डिपॉझिट केली जाते.
मराठी माणसाने नकारात्मक विचार न करता मनापासून उद्योगात उतरुन यशस्वी होण्यासाठी जिद्दीने मेहनत केली पाहिजे आणि यश मिळाल्यानंतर इतर मराठी माणसांनाही मोठे करण्यासाठी योगदान दिले पाहिजे असे मत आमचे प्रतिनिधी उमाजी गायकवाड यांच्याशी बोलताना व्यक्त केले.