काटी : उमाजी गायकवाड
अपघातस्थळी अत्यंत तत्पर सेवा दिल्याबद्दल तामलवाडी ता. तुळजापूर येथे शिक्षिकेकडून रुग्णवाहिका चालक व संपूर्ण टीमचा गौरव करण्यात आला.
तातडीच्या सेवेत रुग्णवाहिका हा महत्त्वाचा घटक आहे. अपघातस्थळी जखमीना उपचारासाठी लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचवणे, प्रथमोपचार करणे अत्यंत आवश्यक असते. तुळजापूर तालुक्याती तामलवाडी टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेने अतिशय कमी वेळात सेवा दिली. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे व्यक्ती एकमेकांपासून दूर जात आहेत .अशा काळात महादेवी कोरे या शिक्षिकेने माणुसकीचे दर्शन घडवले व चालकाचाही गौरव करून समाजापुढे एक उत्तम उदाहरणच ठेवले.
हगलूर जवळील शितल हॉटेल येथे प्रा. समाधान शेणमारे यांचा दुचाकीवरून प्रवास करत असताना अपघात घडला. त्याच वेळी शिक्षिका कोरे या सावरगाव येथून सोलापूरकडे जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. रस्त्यावरून जाणारे कोणीही त्यांच्या जवळ जात नव्हते. त्यावेळी शिक्षिकेने त्यांना आवश्यक ती मदत केली. जखमीच्या पत्नीस खूप इजा झाल्याने छोट्या मुलास जवळ घेतले. अशा या गंभीर परिस्थितीतही त्यांनी तामलवाडी येथील रुग्णवाहिकेस याची माहिती देण्याची तत्परता दाखवली व सर्वांना दवाखाण्यात पोहोचते केले .लहान मुलास स्वतःबरोबर नेऊन त्यांच्या उपचारास सुरुवात होईपर्यंत सहकार्य केलं .
एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी रुग्णवाहिका चालक व समूहाचा तामलवाडी टोल नाका येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. व्यस्त जीवन शैलीमध्ये आपली वेळ गेल्यानंतर मदत करणाऱ्यांचा अनेकदा विसर पडतो .मात्र कोरे यांनी संपूर्ण टीमचा गौरव करून त्यांना अधिक प्रेरणा ,आनंद व उत्साह मिळेल अशी गोष्ट केली . "असे क्षण आमच्या आयुष्यात दुर्मिळ आहेत. आम्हाला अधिक समाधान वाटले व सेवेचा अभिमान वाटल्याची भावना चालक सागर सुभाष लोंढे यांनी व्यक्त केली. ".अचानक अशा झालेल्या सत्काराने सर्वजण भारावून गेले .
यावेळी चालक सागर सुभाष लोंढे, मदतनीस प्रवीण प्रभाकर नवगिरे, प्राण अंबादास कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिफ्ट इनचार्ज पिरप्पा मनगोळी, पाथरूट, दिलीप चव्हाण, शरद माने यांची उपस्थिती होती .