![]() |
पत्रकार विलास येडगे |
नळदुर्ग, दि. 01 : संसर्गजन्य कोरोना आजार दिवसेंदिवस वाढत चालला असून या आजाराची लक्षणे दिसताच संशयित रुग्णांनी न घाबरता, न लपवता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकार विलास येडगे यांनी नळदुर्ग शहरवासियांना केले आहे.
कोरोना झाला असेल तर कुणीही तो लपवुन ठेऊ नये. कारण अशा रुग्णांमुळे इतर अनेक जणांचा जीव जाऊ शकतो. तात्काळ कोरोना झालेल्या रुग्णांनी स्वताची माहिती प्रशासनाला कळवावी. कारण कोरोना झाल्याचे झाकुन राहत नाही. उलट कोरोना झाल्याचे झाकुन ठेवल्यानंतर समाजाला त्याच्यापासून धोका होऊ शकतो. असे झाले तर संबंधितांवर प्रशासनाकडुन कडक कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे कोरोना झाला असेल तर संबंधित व्यक्तीने किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये हा रूग्ण उपचार घेत आहे त्या रुग्णालयाने तात्काळ कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची माहिती प्रशासनाला कळविणे गरजेचे आहे.
रुग्ण आढळलेला परिसर सील केल्यानंतर संबंधित नागरीक बाहेर येवू नये, बाहेर फिरणा-या विरुध्द प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. कोरोना बाधीत रुग्ण इतरांच्या संपर्कात येवू नये, किमान आपले कुटूंब, शहरवासियांच्या हिताचा विचार करुन शासनाने घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. यापुढे नागरिकांनी जागरुक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी अनेकजण मास्क वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर सामाजिक अंतर ठेवणे महत्त्वाचे असताना त्याचीही पायमल्ली होताना दिसत आहे. कृपया आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घरीच थांबावे. प्रशासनाला सहकार्य करुन संसर्गजन्य कोरोना आजारावर मात करुया, ही सर्व शहरवासियांना विनंती...