नळदुर्ग, दि. 04 : तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी येथे बोरी धरणाच्या कोरड्या नदीपाञातून अवैध्दरित्या वाळू उपसा करुन साठा करणा-या पाच जणावर कारवाई करत महसुल पथकाने सुमारे ८०० ब्रास वाळू जप्त केली होती. माञ तब्बल सव्वा वर्षानंतरही या जप्त केलेल्या वाळूचा लिलाव झाला नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त, उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून जप्त केलेल्या वाळूचा तात्काळ लिलाव करावा व दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.
महसुल विभागाच्या अर्थपूर्ण सहभाग व काही वाळू माफियांचा या वाळूवरुन पाय घसरल्यामुळेच या वाळूला पाय फुटल्याची नागरिकांत कुजबूज सुरु आहे. मानेवाडी शिवारात सव्वा वर्षापुर्वी ही वाळू जप्तीची कारवाई दि. 8 जून 2019 रोजी करण्यात आली होती. माञ यानंतर या वाळूचे काय झाले असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
बोरी नदीच्या पात्रात वाळूमा माफियांनी रात्री व दिवसा बेकायदेशीर हजारो ब्रास वाळू उपसा करुन शासनाचे लाखो रुपयाचा महसूल बुडविल्याची चर्चा आहे.
काय आहे प्रकरण?
काही वाळू माफियांनी बोरी नदीच्या पात्रात राञीच्या सुमारास वाळू काढून राजरोसपणे वाळू तस्करीचा धंदा सुरू केल्याचे सर्वश्रूत आहे. यामध्ये मानेवाडी, चिकुंद्रा व नळदुर्ग येथील वाळूमाफियांचा समावेश असल्याचे समजते. महसूल विभागाचे सलगरा येथील मंडळाधिकारी शिंदे, नळदुर्ग येथील गाव कामगार तलाठी टी.डी. कदम, बारुळचे तलाठी जगदाळे, किलजचे तलाठी माने यांच्या पथकाने जुन २०१९ मध्ये ही कारवाई धुमधडाक्यात करीत मानेवाडी येथील बोरी धरणाच्या पात्रात वाळू काढणाऱ्या पाच वाळूमाफियांवर कारवाई केली होती. यावेळी साठा करुन ठेवलेल्या वाळूचे पंचनामा करुन आठशे ब्रास वाळू जप्त केली होती.
अनेक प्रश्न अनुत्तरीत
* या वाळूचा पंचनामा प्रत देण्यास टाळाटाळ
* या कारवाई वेळचे तहसीलदार बदलून गेल्यानंतर नव्या तहसीलदार माञ ते या प्रकरणापासून अनभिज्ञ
* सव्वा वर्षात वाळूचा लिलाव का बोलावला नाही.
* मानेवाडी गावात व शेत शिवारात सर्वञ वाळूचे ढिगारे माञ कारवाई केली नाही
* चिकुंद्रा येथेही तीच स्थिती माञ वर्तमान पञात बातमी आल्यानंतर फक्त मानेवाडी येथे कारवाई, राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा
* कारवाई नंतरही जप्त केलेली वाळू बिनदिक्कत चोरून विक्री
* यास जिम्मेदार लोकसेवकावर कोणाची कृपादृष्टी, आतातरी कारवाई होणार का? असा प्रतिसवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी तलाठी टी.डी. कदम यांच्याशी संपर्क साधले असता, अद्यापपर्यंत जप्त केलेल्या वाळूचा लिलाव झाला नाही. लवकरच लिलाव करण्यात येईल. तहसिलदारसह इतर अधिकारी सध्या क्वारंटाईन असल्याचे सांगितले.