नळदुर्ग, दि. 05 : 

तुळजापुर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथील ग्रा.पं. मध्ये सन 2005 ते आजतागायत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने उस्मानाबाद जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे हिप्परगा ताड ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायत मधील कर्मचा-यासह ग्रामसेवक व सरपंच यांनी 2005 ते आजतागायत शासकीय योजनेची कामे फक्त कागदोपत्रीच केली असल्याचे आरोप करुन निवेदनात पुढे म्हटले आहे की, या संबंधी 2015 पासून वारंवार तक्रार देवून सुध्दा कोणतीही चौकशी झाली नाही. तरी या ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत विशेष चौकशी कमिटी नेमून सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष विजय भोसले, सुजित दळवे, सुरज बचाटे, बाळासाहेब भिसे, शुभम भिसे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top