तुळजापूर, दि. 18 : तालुक्यातील मंगरुळ येथे बैलपोळा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळ्यानिमित्त मंगरुळ येथील शेतकरी ह.भ.प. दगडू रावसाहेब डोंगरे यांनी बैलांना सजवून  त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी करुन पुरणपोळीचा नैवेद्य खायला देऊन कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली. दरम्यान, कोरोनामुळे बैलाची मिरवणूक न काढता शेतामध्येच साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला

बैलपोळा निमित्त बैलांची खांदेमळणी करुन बैलांच्या शिंगांणा छान रंग व बेगड लावून तसेच अंगावर झूल व बैलांच्या डोक्याला  बाशिंग, वेसन, मोरकी, कंडे, गळ्यात घुंगराची माळ, बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटाउन बैलांची सजावट करण्यात आली होती. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत व बैलांची ढोलताशांसह मिरवणूक न काढता बैलपोळा सण साधेपणाने साजरा करण्यात आला.

यावेळी ह.भ.प. दगडू रावसाहेब डोंगरे, मंगरूळ ग्रामपंचायत सदस्य किसन आप्पा डोंगरे, सागर खोपडे, प्रवीण कोरेकर, विनायक डोंगरे, शशिकांत खंडाळकर अविनाश डोंगरे, सागर डोंगरे, हर्षवर्धन डोंगरे, ध्रुव डोंगरे आदीजण उपस्थित होते.



 
Top