नळदुर्ग, दि. 09 : तुळजापूर तालुक्यात प्रथमच आधुनिक पध्दतीचे ऊसतोडणी करीता शक्तीमान कंपनीची हार्वेस्टर मशीन नळदुर्ग मध्ये दाखल झाली असून या मशीनचे स्वागत व पूजन मोठया उत्साहात नुकतेच करण्यात आले आहे.
नळदुर्ग येथील उदयोजक तथा विकास ट्रेडर्सचे संचालक मनीष हजारे यांनी वेळेत ऊसतोडणी व्हावी व शेतक-यांचे ससेहोलपट थांबविण्यासाठी आधुनिक पध्दतीची ऊसतोडणी यंत्र हार्वेस्टर नळदुर्गमध्ये आणले आहे. या यंत्राचे पूजन मनीष हजारे यांच्या मातोश्री सौ. कविता सतीशसिंग हजारे, बिराजदार शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी रामचंद्र शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनीष हजारे, पत्रकार शिवाजी नाईक, माजी नगरसेवक सुधीर हजारे, महेबुब शेख, शिवाजी जाधव, संतोष राठोड, राहुल हजारे, महेश हजारे, नितीन चौधरी, अजीज शेख, आप्पा बिराजदार, सागर हजारे, उध्दव राठोड, आबाजी बागडे, राजाराम चव्हाण, चाँद शेख, पृथ्वीराज चव्हाण आदीसह हजारे ग्रुपचे कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येनी उपस्थित होते.
हार्वेस्टर मशिनने ऊस मुळापासून तोडला जातो. त्यामुळे एकरी उत्पादन वाढते. नुकसानही होत नाही. तोडलेला ऊस कमी वेळेत कारखान्याच्या काट्यावर पोहोचल्याने तो वाळत नाही. त्यामुळे वजन वाढते. ऊस थेट कारखान्याच्या गव्हाणीत पोहोचतो. या यंत्रामुळे ऊसतोडणी मजुरांच्या मागे धावण्याची गरज नाही. ऊसतोड कामगारांना तोडणीसाठी शेतकऱ्याला खूप आर्जव करावे लागायचे. प्रसंगी पैसे खर्च होतात आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जी ऊसतोडणी व्हायला एक महिना लागेल ती अवघी चार दिवसांत झाल्याने शेतक-यांतून या मशीनचे स्वागत केले जात आहे.
